पिंपरी : – समाजाला कशाची गरज आहे ते विचारात घेऊन मार्गदर्शन करणारा कीर्तनकार हा दिशादर्शक असतो. स्वतः अंध असून भाऊसाहेब विठोबा गोरे यांनी पत्नी सुवर्णा व चिरंजीव रामचंद्र यांच्या सहकार्याने ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली हा त्यांच्यातला सदगुण आहे. अशा सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे. दुर्गुणांना समाजाने लांब ठेवले पाहिजे. आज काही कीर्तनकार ओंगळवाणे प्रदर्शन करत कीर्तन करतात आणि वाहव्वा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे, असे परखड मत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले.
संत तुकाराम महाराज वाङमय संशोधन मंडळाद्वारे गाथा मंदिर प्रकल्प अंतर्गत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन देहू येथे करण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते आढळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथील हभप भाऊसाहेब विठोबा गोरे महाराज यांचा पुरस्कार देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. ५१ हजार रुपये, प्रमाणपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच संतश्री गुरूकुल संस्थान संचालित वारकरी शिक्षण संस्थेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कीर्तनकार हभप बंडातात्या कराडकर, संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराज वाङमय संशोधन मंडळ तथा गाथा मंदिर चे अध्यक्ष हभप पांडुरंग अनाजी घुले, हभप वैभव महाराज राक्षे, जालिंदर काळोखे, उद्योजक विजय जगताप, पीएमपीएल चे कामगार नेते आबा गोरे आदी उपस्थित होते.
गाथा मंदिराच्या गुरूकुल संस्थान मधून मराठी, संस्कृत याबरोबरच हिंदी, इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. आजच्या आधुनिक युगात सुसंस्कृत नवीन पिढी घडविण्याचे कार्य संस्था करीत आहे. हे विद्यार्थी येत्या काळात समाज घडविण्याचे कार्य करतील. त्यामुळे भविष्याची चिंता करण्याची गरज नाही असे गोविंद गिरी महाराज म्हणाले.
गुरूकुल समाज घडविण्याचे स्थायी कार्य करीत आहे. चांगले साधक तयार होऊन समाजाला दिशा देण्याचे काम करतील, असा विश्वास आहे, हभप बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केला.
हभप भाऊसाहेब गोरे यांना मिळालेल्या पुरस्काराच्या रक्कमेत गोरे कुटुंबीयांनी भर घालून ५२ हजारांचा धनादेश गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते गाथा मंदिर मंडळाकडे सुपूर्द केला. तसेच गोरे महाराज आणि पत्नी सुवर्णा यांच्या हस्ते पंधरा हजारांचा धनादेश भक्ती शक्ती प्रासादिक दिंडी साठी अध्यक्ष कुंडलिक जाधव, उपाध्यक्ष अशोक काळे, सुखदेव काळोखे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमास राज्यभरातून तुकाराम बीजे निमित्ताने आलेले वारकरी, भाविक उपस्थित होते. संत तुकाराम महाराज गाथा मंदिराचे अध्यक्ष हभप पांडुरंग तानाजी घुले यांनी स्वागत प्रास्ताविक करताना गुरुकुलच्या कार्याचा आढावा घेतला. सुत्रसंचलन जालिंदर काळोखे, आभार हभप वैभव महाराज राक्षे यांनी मानले.