पु. ल. देशपांडे यांच्या ‘बिगरी ते मॅट्रिक’ कथाकथनाने भारती विद्यापीठात हास्यकल्लोळ

पुणे: भारती विद्यापीठाच्या महिलाअभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे लिखित ‘बिगरी ते मॅट्रिक’ या कथाकथनाचा रंगतदार अनुभव उपस्थित प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना मिळाला.

भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनचे प्राचार्य आणि प्रसिद्ध अभिनेते मा. श्री. राजेंद्र उत्तुरकर यांनी हे कथाकथन अनोख्या शैलीत सादर केले. त्यांच्या सादरीकरणातील उत्स्फूर्तता आणि विनोदाच्या खास शैलीमुळे संपूर्ण प्रेक्षकवर्ग पोट धरून हसत होता आणि कार्यक्रमाने हास्याचा अक्षरशः कल्लोळ उडवला.

कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांच्या उपस्थितीत झाले. त्यांनी प्रमुख पाहुणे मा. श्री. राजेंद्र उत्तुरकर यांचे स्वागत व सन्मान केला.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव म्हणाले, “पु. ल. देशपांडे यांचे लेखन हे केवळ विनोदासाठी नसून, ते समाजातील विविध प्रवृत्ती, मानसिकता आणि जीवनशैलीचे हुबेहुब दर्शन घडवते. आजच्या या सादरीकरणाने पुन्हा एकदा त्यांच्या साहित्याची जादू अनुभवण्याची संधी दिली. श्री. उत्तुरकर सरांचे सादरीकरण अत्यंत प्रभावी आणि मनोरंजक होते, ज्यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.”

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. डॉ. महारुद्र कापसे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली, तर प्रा. अंजली कदम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर प्रा. मुग्धा राणे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अविनाश पवार, उपप्राचार्या प्रा. डॉ. सुवर्णा चोरगे, सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

See also  महाळुंगे येथील इक्वीलाईफ होम्स सोसायटीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी