‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ वितरण कार्यक्रम २६ मार्च रोजी

 

पुणे : राज्यातील वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना देण्यात येणाऱ्या २०१८ व २०१९ यावर्षीच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ वितरण सोहळा २६ मार्च २०२३ रोजी दुपारी १ वाजता यशदा येथे होणार आहे.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहेत. यासोबतच प्रधान सचिव (वने) बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, नागपूर वाय. एल. पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण डॉ. सुनिता सिंग आदीदेखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था व ग्राम/विभाग/जिल्हा या पाच संवर्गामध्ये राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आणि महसूल विभाग (वृत्तस्तर) स्तरीय प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात येते.

राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाकरिता १ लाख रुपये, द्वितीय क्रमांक ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांक ५० हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र तसेच विभाग स्तरीय प्रथम क्रमांकाकरिता ५० हजार रुपये आणि द्वितीय क्रमांकाकरिता ३० हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

२०१७ पर्यंत ५२३ व्यक्ती, संस्थांना ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले आहे. २०१८ व २०१९ मध्ये प्रत्येकी १४ याप्रमाणे एकूण २८ व्यक्ती, संस्था यांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभाग पुणेचे विभागीय वनअधिकारी ए. पी. थोरात यांनी कळविले आहे.

See also  नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न