पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैसे न भरल्याने उपचार केले नाहीत. त्यामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नीला आपला जीव गमवावा लागला आहे. सुशांत भिसे यांच्या पत्नी गर्भवती होत्या, त्यांना प्रसूती वेदना होत असल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, तिथे पैशांसाठी रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला. अखेर, दुसऱ्या रुग्णालयात प्रसूतीदरम्यान तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. त्यांनी जुळ्यांना जन्म दिला, पण आपल्या पोरांना कुशीत घेण्याआधीच त्या हे जग सोडून निघून गेल्या. त्यांच्या अशा जाण्याने सुशांत भिसे यांना मोठा धक्का बसला आहे.
सुशांत भिसे हे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. तसेच, ते सामर्थ्य प्रबोधिनी या सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. संपूर्ण राज्यात आरोग्य दूत म्हणून त्यांची ओळख आहे. करोना काळामध्ये साडेतीन हजारहून अधिक रुग्णांना त्यांनी थेट मदत केली. सुशांत भिसे यांनी अनेक लोकांना रुग्णालयात बिल कमी करून दिलं होतं, त्यांची मदत केली होती. सुशांत भिसे यांना आरोग्य दूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होत. पण, नियती त्यांच्याबाबत इतकी निष्ठूर असेल असा त्यांनी कधी विचारही केला नसेल. सर्वांची मदत करणारे सुशांत भिसे हे वेळ आल्यावर आपल्या पत्नीला वाचवू शकले नाहीत.
सुशांत भिसे यांच्या पत्नी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूती वेदनेने विव्हळत असताना रुग्णालय प्रशासन मात्र १० लाख रुपयांसाठी अडून बसलं होतं. १० लाख भरा तरंच प्रसूती करु असं सांगण्यात आलं. तब्बल दोन ते तीस तास तनिषा या त्रास सहन करत होत्या. कुटुंबीयांनी ३ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. तुम्ही उपचार सुरु करा, उर्वरित पैसे नंतर भरु असंही त्यांनी सांगितलं. इतकंच काय तर, मुख्यमंत्री सहाय्यता निधीने प्रमुख रामेश्वर नाईक यांनी रुग्णालयात फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने तनिषा यांच्यावर दया दाखवली नाही. अखेर दुसऱ्या रुग्णालयान नेताना त्यांना अतिरक्तस्त्राव झाला. तिथे प्रसूतीदरम्यान तनिषा यांचा मृत्यू झाला.