दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या चौकशीसाठी भ्रष्ट अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती: मनसेचे राम बोरकर यांची समितीतून भ्रष्ट अधिकारी वगळण्याची मागणी

पुणे : दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी चौकशी बाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभागाच्या वतीने उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असलेले डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे समिती नियुक्त करण्यात आली असून यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर उपाध्यक्ष राम बोरकर यांनी आक्षेप घेतला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्याकडून दोषारोप असलेल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची निःपक्षपाती चौकशी कशी होईल असा प्रश्न राम बोरकर यांनी उपस्थित केला आहे.

मनसेचे राम बोरकर म्हणाले, डॉक्टर राधाकिशन पवार भ्रष्टाचारी असून त्यांच्यावरती दीड वर्षापासून शासनाची चौकशी सुरू आहे. कामगारांकडून पैसे मागितल्या प्रकरणी त्यांची राज्य शासनाकडून चौकशी सुरू आहे आणि ही चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. चुकीच्या हॉस्पिटल प्रशासनाची चुकीच्या माणसाकडून चौकशी होत आहे. म्हणजे गुन्हेगाराची गुन्हेगारकडून चौकशी होणार आहे. यामुळे ही चौकशी हे निप:क्षपाती होणार नाही.

महाराष्ट्र सरकारला जर पीडित भिसे कुटुंबाला खरंच न्याय द्यायचा असेल तर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या डॉक्टर राधाकिशन पवार यांना चौकशी समितीतून काढण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर उपाध्यक्ष राम बोरकर यांनी केली आहे.

See also  माजी मंत्री, आमदार पंकजा मुंडे यांच्या हस्ते 'धागा' स्वदेशी मेळ्याचे शुक्रवारी उद्घाटन