मुंबई, दि.९ :- आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि वाढलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी, शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य जपणे महत्वाचे आहे. विशेषतः तरुण पिढीना आणि महिलांना या धावपळीच्या ताणतणावाचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर योगाचा अंगीकार करून शारीरिक व मानसिक आरोग्य जपावे,असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘अंतर योग फाउंडेशन’ ला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान अंतर योग फाउंडेशन उपक्रमांची माहिती घेतली तसेच फाउंडेशनद्वारे योग आणि मानसिक आरोग्यविषयक सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, महिलांना आणि युवापिढीला योग व आध्यात्मिकतेच्या मार्गाकडे प्रवृत्त करून त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. आजच्या काळात मानसिक आरोग्य ही महत्त्वाची बाब असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो असेही यावेळी सांगितले.यावेळी अंतर योग फाउंडेशनचे संस्थापक व अध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी आणि अंतर योग फाउंडेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.