पुणेः- राजकीय आयुष्याच्या वाटचालीत नक्की कोण कोणाचा प्रतिस्पर्धी हे सांगणे अवघड असते. एकमेकांचे पाय ओढणे, एकमेकांच्या उरावर बसणे याला रोजच्या राजकीय जीवनात सामोरे जावे लागते. कोण कोणाला धोबी पछाड करेल, हे सांगता येत नाही. कुस्तीप्रमाणेच राजकारणतही डावपेच आणि डाव-प्रतिडाव सुरू असतात, असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
कै. पै. वसंतराव सयाजी बेनकर प्रतिष्ठानतर्फे कै. पै. वसंतराव सयाजी बेनकर यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित जिल्हा आणि तालुकास्तरीय निमंत्रित मुलींच्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आज छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष वैजयंती वसंतराव बेनकर, सारिका डोके, दुर्गा बोरावके, गौरी पिंगळे, अॅड. मंगेश ससाणे, रोहिणी रासकर, सुनिता भगत, संध्या बेनकर, अक्षय पिंगळे, अक्षय बेनकर, भाऊसाहेब डोके, राजेंद्र बोरावके यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता मुलांप्रमाणेच मुलींना देखील क्रीडा क्षेत्रात समान संधी मिळाल्यास त्या त्यांची चुणूक दाखवून देतात. लहान वयातच मुला-मुलींवर खेळांचे संस्कार झाल्यास ते ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्यापर्यंत मजल मारू शकतात. शहरांसोबतच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुला-मुलींचे क्रीडा कौशल्य ओळखून त्यांना वेळीच प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी सोसलेले कष्ट आणि हालअपेष्टा यांची जाणीव ठेवत समाजाने मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आग्रही राहिले पाहिजे. महात्मा फुले यांच्या समग्र वाङ्मयाचे घराघरात वाचन झाले पाहिजे. यातून नवीन पिढीध्ये महिलांना आदर देण्याचे संस्कार रूजवता येतील. मुलींनी खेळांबरोबरच राजकारणात येणे देखील आवश्यक आहे. कारण मोदी सरकार २०२९ मध्ये विधानसभा आणि विधान परिषदेसाठी महिलांना ५० टक्के आरक्षण लागू करणार आहे. राजकीय घराण्यांचा धांडोळा घेतला असता वडिलांचा राजकीय वारसा चालविणाऱ्या अनेक मुली आपल्याला सध्याच्या राजकारणात दिसून येतात. शरद पवार-सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक उदाहरणे आढळून येतात.
यावेळी बोलताना प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष वैजयंती वसंतराव बेनकर म्हणाल्या की, कै. पै. वसंतराव सयाजी बेनकर प्रतिष्ठान तर्फे घेण्यात येणारी ही स्पर्धा राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने गेले तीन वर्ष सुरू आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा महिलांनी महिलांकरता घेतलेली महाराष्ट्रातील पहिली नामांकित कुस्ती आहे. ही केवळ स्पर्धा नसून महिला खेळाडूंना समान संधी आणि मान्यता मिळावी यासाठीचा प्रयत्न आहे. महिला कुस्ती ही केवळ खेळ नसून सामाजिक पुरोगामीत्वाचे प्रतीक असून या स्पर्धेद्वारे युवतींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि खेळातील लिंगभेदाच्या संकुचित विचारसरणीला आवाहन देणे हे उद्दिष्ट आहे. गौरी पिंगळे यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.