सुसगाव येथे तोडलेल्या झाडांच्या जागी पुन्हा वृक्षारोपण करत वृक्षतोडीचा तीव्र निषेध नोंदवला

सुसगाव : सुसगाव येथे काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या ठेकेदाराने खाजगी काम करताना अनाधिकृतरित्या पालिकेच्या कार्यालयासमोरील झाडे तोडली होती. सुस ग्रामस्थांनी तोडलेल्या झाडांच्या जागी पुन्हा वृक्षारोपण करत या वृक्षतोडीचा तीव्र निषेध व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने योग्य कारवाई करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांनी यावेळी पालिकेचा देखील निषेध नोंदवला.

सुसगाव येथे पुणे महानगर पालिकेचे नाव सांगून एका ठेकेदाराने झाडांची कत्तल करुन लोकभावना दुखावल्या होत्या. वृक्षतोडीला परवानगी नसताना तसेच डांबरीकरणाची परवानगी नसताना देखील स्थानिक राजकीय नेत्यांच्या लाभासाठी पुणे महानगरपालिकेच्या ठेकेदाराने वृक्षतोड केली होती. यावेळी नागरिकांनी ठेकेदाराची गाडी पकडून देत पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पुराव्यासह सुपूर्द केली होती. परंतु पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांनी योग्य कारवाई न करता अद्याप गुन्हा दाखल केला नाही या पार्श्वभूमीवर सुस ग्रामस्थांनी तोडलेल्या झाडांच्या जागी पुन्हा वृक्षारोपण करत ग्रामस्थांच्या भावना व्यक्त केल्या.

सुसगाव मध्ये धार्मिक परंपरांसाठी या झाडांचा वापर केला जात होता. खंडोबाचे जागरण गोंधळ असलेवर ग्रामस्थ पाचपाऊली करुन ज्या झाडाखाली पुजा बाधंयचे  व अंत्ययात्रेला जाताना विसावा देण्यासाठी असलेले व इतर परंपरा असलेल्या झाडाची कत्तल करण्यात आली. या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुसगाव ग्रामस्थांनी मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती व पुणे महानगरपालिकेचे शासन नियुक्त सदस्य बाळासाहेब चांदेरे यांच्या नेतृत्वात एकत्र येत वृक्षारोपण केले.

See also  पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी पाटील इस्टेट परिसराला भेट देऊन नागरिकांच्या समस्यांची प्रत्यक्ष पाहणी