पुणे महापौर केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील चौकशी समितीचा अहवाल पुणे मनपा अ.आयुक्त कार्यालयातून गायब

पुणे : पुणे महापौर केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील भ्रष्टाचार प्रकरणी 2020 साली नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (विशेष) यांच्या कार्यालयातून गायब झाला आहे. 

खराडी येथे झालेल्या पुणे महापौर केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे पुराव्यासह आरोप करण्यात आले होते. याबाबत चौकशी करून गुन्हे दाखल करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे तत्कालीन आयुक्त शेखर गायकवाड यांनी तीन सदस्य असलेली चौकशी समिती नियुक्त करून अहवाल 2020 साली मागवला होता. त्याप्रमाणे दिनांक 4/10/2022 रोजी अनु.क्र. 3178 अन्वये सदर चौकशी अहवाल अतिरिक्त आयुक्त विशेष यांच्या मार्फत आयुक्तांना सादर करण्यासाठी पाठवण्यात आला होता.

परंतु हा अहवाल मागील काही महिन्यांपासून गायब झाल्याने तो कार्यालयात सापडत नसल्याचे तक्रारदारांना सातत्याने सांगितले जात आहे. सदर अहवाल आयुक्त कार्यालयातून गायब होण्याची बाब ही गंभीर आहे. या बाबत हमाल तालीम संघाचे विश्वस्त गोरख भिकुले यांनी आयुक्तांकडे तक्रार केली असून यावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अनेकदा कागदपत्रे सापडत नसल्याचे कारण सांगितले जाते. याबाबत लेखी खुलासा दिला जात नाही. पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयां मधून महत्त्वाची कागदपत्रे नागरिकांचे तक्रारीचे अर्ज गायब कसे होतात याबाबत चौकशी करण्यात यावी तसेच आयुक्तांनी अर्ज गायब होणाऱ्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी गोरख भिकुले यांनी केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या कोणत्याही कार्यालयामध्ये फाईल व अर्ज गायब होणे अथवा न सापडणे याचे कारण देऊन नागरिकांना हेलपाटे मारायला लावले जातात. यातूनच काही प्रमाणात काम लवकर होण्यासाठी अथवा वेळेवर होण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण होते भ्रष्टाचार देखील होतो. कागदपत्रे न सापडण्याचे कारण सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने चौकशी नेमण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे.

See also  पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यात येईल- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील