पुणे : पावसामुळे भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर येथील रस्त्यावरील भक्ती-शक्ती शिल्प कमान चौकात पाऊस झाल्यावर ड्रेनेज झाकण वर येऊन सर्व मैला मिश्रित घाण पाणी दोन-तीन तास रस्त्यावरून वाहात आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी गोरखनाथ भिकुले यांनी केली आहे.
घाण पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागली हा प्रकार दरवर्षी पावसाळ्यात होत आहे. या रस्त्यावरील ड्रेनेज लाईनची कामे योग्य पध्दतीने व व्यवस्थितपणे केलेली नसल्याने ड्रेनेज लाईन मधून पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळेच सर्व पाणी रस्त्यावरून वाहत आहे त्यातच मनपाने नवरंग मित्र मंडळा जवळ मेन ड्रेनेज लाईन ही पावसाळी गटर लाईन ला जोडलेली असल्याने मैलायुक्त घाणपाणी पावसाळी गटर लाईन मधून वाहत असते. त्यामुळे उघड्या जाळीतून दुर्घंदीयुक्त घाण वासामुळे स्थानिकांना रोज त्रास होत आहे याबाबत आम्ही मा.आयुक्त साहेब व संबधित अधिकारी यांच्या कडे तक्रार करून सुध्दा सदरचे दुरूस्तीचे काम होत नाही. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे गंभीर झाला आहे.
तसेच दरवर्षी होणा-या पालखी सोहळ्याच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी भाविक सदर परिसरात येत असतात त्यावेळी पाऊस झाल्यावर रस्त्यावरून वाहणा-या या मैलायुक्त घाण पाण्यातून भाविकांना जावे लागते.याबाबत आम्ही पुणे मनपा आयुक्त व संबंधित अधिकारी यांना लेखी तक्रार करून सुध्दा सदरचे काम होत नाही.तरी याचे गांभीर्य घेवून आगामी पालखी सोहळ्याच्या अगोदर सदरचे दुरूस्तीचे काम व्हावे. अशी मागणी गोरखनाथ भिकुले,विश्वस्त भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर पुणे यांनी केली आहे.