बाणेर : काही वर्षांपूर्वी बाणेर बालेवाडी परिसराचा स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्ट सिटी एरिया म्हणून समावेश करण्यात आला होता. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले सायकल ट्रॅक हे सायकल चालवण्यासाठी योग्य नाहीत ही बाब अनेकदा अधोरेखित झाले आहे. बाणेर परिसरात सायकलोथॉनच्या निमित्ताने अनेक नागरिक रस्त्यावर सायकल घेऊन एका चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी झाले खरे पण त्यांना पुणे महानगरपालिकेने बनवलेल्या सायकल ट्रॅकचा आनंद घेता आला नाही.
बाणेर बालेवाडी परिसरामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक ठिकाणी सायकल ट्रॅक बनवण्यात आले आहे. या सायकल ट्रॅक वर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत. बऱ्याच सायकल ट्रॅक वर अवैद्य पार्किंग करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी सायकल ट्रॅकच गायब झाल्याचे दिसून येत आहे.
काही रस्त्यांवर फक्त रस्त्याच्या कडेला सायकल ट्रॅकचे लाल पट्टे मारण्यात आले आहेत. तर बाणेर मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी झाडे झुडपे वाढल्यामुळे सायकल ट्रॅक वर सायकल चालवणे अवघड झाले आहे. पुणे शहरांमध्ये अनेक राजकीय नेते सायकल चालवण्याचे उपक्रम घेत असतात परंतु पुणे शहरातील कोट्यावधी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेले सायकल ट्रॅक हे सायकल चालवणे योग्य झाले आहेत का? याबाबत मात्र प्रशासन फारसे गंभीर नाही. सुरक्षित सायकल चालवण्यासाठी जागा नसल्याने अनेक ठिकाणी सायकल आडगळी पडल्या आहेत. पालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून निर्माण केलेले सायकल ट्रॅक ही कुठेतरी आडगळीत पडली आहे अथवा पूर्णच झालेले नाही असे चित्र सध्यातरी बाणेर परिसरातील या सायक्लोथॉन मुळे निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सायकलींची चर्चा ही राजकीय इव्हेंट ठरू नये तर नागरिकांच्या कररूपी कोट्यावधी रुपयातून उभारण्यात आलेले सायकल ट्रॅक सायकल चालवणाऱ्या नागरिकांना वापरता यावेत यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.