राजकीय अनैतिकतेचे काळे ढग शिक्षण क्षेत्रासाठी घातक : डॉ. रमेश पानसे

पुणे : शिक्षणक्षेत्राविषयी कुठल्याही राजकीय पक्षावर विसंबून राहण्याची सध्याची परिस्थिती नाही. राजकीय क्षेत्राइतकी अनैतिकता दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात नाही. हे राजकीय अनैतिकतेचे काळे ढग शिक्षण क्षेत्रासाठी घातक आहेत. शासकीय शैक्षणिक क्षेत्रात भ्रष्टाचार वाढीस लागलेला असून नीतिमत्ता संपलेली आहे. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता बिघडत चाललेली आहे, अशी खरमरीत टीका ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व ग्राममंगलचे संस्थापक डॉ. रमेश पानसे यांनी केली.


सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे संस्थेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पु. ग. वैद्य यांच्या नावाने देण्यात आलेल्या पहिल्या कार्यगौरव पुरस्काराने डॉ. रमेश पानसे यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. पुरस्काराचे वितरण समरसता पुनरुत्थान गुरुकुलमचे संस्थापक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध कथाकार भारत सासणे होते. रोख रक्कम, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. वसुंधरा पुरुषोत्तम वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी मंचावर होते. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे आज (दि. 7) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


शिक्षण क्षेत्रात बालसाहित्यावर लिखाण झाले असले तरी सर्वसामान्यांसाठी असलेले बालसाहित्य आजही दुर्लक्षित आहे, असे मत नोंदवून डॉ. रमेश पानसे पुढे म्हणाले, मुलांच्या सहवासात त्यांच्या गरजेनुसार घडलेल्या साहित्यकृतींची दखल साहित्यिक तसेच साहित्य संस्थांनी घेणे आवश्यक आहे. साहित्य कुठेही उगवते. मराठी भाषेत आदिवासी मुले मोठ्या प्रमाणात कथा, कवितांचे लिखाण करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कल्पनाशक्तीला खतपाणी मिळावे या हेतूने संस्थात्मक पातळीवर कार्य होणे आवश्यक आहे. या करीता ‌‘ग्राममंगल‌’मध्ये अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेची शाखा सुरू करण्याची इच्छा आहे. ते पुढे म्हणाले, मातृभाषेचे ज्ञान उत्तमप्रकारे येण्याआधीच इंग्रजी भाषेचे शिक्षण शासनाने सक्तीचे केल्यामुळे मुलांचे इंग्रजीच नाही तर मराठी देखील कच्चे राहिले आहे. ज्यामुळे सगळे शिक्षणच मागे पडत आहे. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या शासन निर्णयाला विरोध असल्याचेही ते म्हणाले. शिक्षण संस्थांचे यश दाखविण्यासाठी अंतर्गत गुण दिले जातात या पद्धतीवरही त्यांनी टीका केली.

खोट्या शिक्षकांची संख्या आठ हजारांवर..
शिक्षण पद्धतीतील शासकीय भ्रष्टाचार या विषयी बोलताना डॉ. पानसे म्हणाले, आठ हजारांहून अधिक खोटे शिक्षक सध्या कार्यरत आहेत. या क्षेत्रात सरकारी हुकुमशाही वाढत चालली आहे. लोकप्रतिनिधींच्या हव्यासापोटी या गोष्टी घडत आहेत.

गिरीश प्रभुणे म्हणाले, पुस्तकी शिक्षणामुळे गोठे निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत डॉ. रमेश पानसे यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक प्रयोग केले आहेत. पाठ्यक्रम शिक्षणात सुलभता, मुलांना समजेल अशा भाषेत शिक्षण, आजच्या युगाला साजेसे प्रयोग त्यासाठी साधननिर्मिती तसेच मुलांसाठी निर्माण केलेले साहित्य संवादात्मक करणे, विविध उपक्रम, प्रयोग, साहित्य तयार करणे यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात सुबोध पद्धतीने कार्य करताना ग्रामीण व्यवस्था, अर्थशास्त्र, मुलांची आत्मसात करण्याची क्षमता, हस्तकौशल्य याविषयी डॉ. पानसे विविध प्रयोग करीत आहेत. पु. ग. वैद्य यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा प्रभुणे यांनी गौरव केला.

See also  साईचौक ते मधुबन बालेवाडी या रस्त्यावरच मांस टाकले जात असल्याने नागरिक त्रस्त


अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना भारत सासणे म्हणाले, संस्कार, अभिरुची, व्यक्ती जाणिव, पुस्तकांची उपलब्धता, वाचन आणि शिक्षणाचा प्रारंभ हे मुलांच्या वाढीचे विविध टप्पे आहेत. किशोर वयात मुलांना कुठले साहित्य वाचायला मिळावे या विषयी चर्चा होणे आवश्यक आहे. मुलांच्या वाढीच्या वयात मूल्यव्यवस्था, माणुसकी, आनंदाचा आविष्कार, कला, आदरभाव, व्यक्तीविकास, नैतिकता याविषयी माहिती करून देणे आवश्यक असते. मुलांच्या जीवनातून अद्भुत रस हद्दपार झाल्यास पुढे जाऊन ही मुले शुष्क पोटार्थी बनतात. त्यामुळे बालसाहित्यातून मनोरंजन, अद्भुतता नाहीशी होणे धोक्याचे आहे. न वाचणारी व्यक्ती मोठ्या पदांवर कार्यरत होतात तेव्हा इतिहास, सहिष्णुता, मानवता यांच्याबद्दल सजग नसल्यामुळे त्यांच्यात नैतिकतेबद्दलही जागरुकता निर्माण होत नाही.

प्रास्ताविकात अनिल कुलकर्णी यांनी पुरस्काराविषयी तर माधव राजगुरू यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती सांगितली. सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन डॉ. स्वाती महाळंक यांनी केले. तर आभार कोषाध्यक्ष संजय ऐलवाड यांनी मानले.