पुणे : भारतीय जनता पक्षाने बुधवारी लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश असून पुण्यातून माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे.
मोहोळ यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलेले आहे. यासोबतच ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी अडीच वर्ष महापौरपद देखील भूषवले होते. मोहोळ यांच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले वजन वापरल्याचे बोलले जात आहे.
कोविड काळात त्यांनी केलेले काम लोकांच्या पसंतीस उतरले होते. या काळात त्यांनी शहरात सर्वत्र फिरून आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी देखील प्रयत्न केले होते. यासोबतच लोकसभेच्या अनुषंगाने त्यांनी बरीच बांधणी केली होती. मागील काही महिन्यात शहरात सर्वत्र फिरून संपर्क देखील अधिक घट्ट केला होता. विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत तसेच स्वत: मोठमोठे कार्यक्रम घेत दावेदारी अधिक मजबूत केली होती.
राज्यसभेवर कोथरूड मतदार संघातील मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची खासदारकी दिल्यानंतर पुण्यामध्ये मराठा उमेदवारांना संधी मिळणार अशी चर्चा होती. त्यानुसार भाजपाने पुणे शहरात मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून मराठा उमेदवार दिला आहे.
राज्यातील भाजपाने जाहीर केलेले उमेदवार –
नागपूरमधून नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंढे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आले आहे. नंदुरबार – डॉ. हिना गावीत, धुळे – डॉ. सुभाष भामरे, जळगाव – स्मिता वाघ, रावेर – रक्षा खडसे, अकोला – अनुप धोत्रे, वर्धा – रामदास तडस, नांदेड – प्रतापराव चिखलीकर, जालना- रावसाहेब दानवे, दिंडोरी – डॉ. भारती पवार, भिवंडी – कपिल पाटील, मुंबई उत्तर – पीयूष गोयल, मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा, अहमदनगर – डॉ. सुजी विखे-पाटील, लातूर – सुधार शृंगारे, माढा – रणजीतसिन्हा नाईकनिंबाळकर, सांगली – संजयकाका पाटील अशी उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत.