पुणे :- शास्त्रीय नृत्यकला आणि लोककलेला प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी आहे. त्यामुळे संगीत आणि नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कलेचा हा ठेवा जपण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोथरुडमध्ये नृत्यसंकुल उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था यांच्या माध्यमातून कोथरुड मध्ये नृत्यवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, ज्येष्ठ पत्रकार विजय बाविस्कर, प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना शमा भाटे, मनिषा साठे, सुचेता चाफेकर, आयोजक अजय धोंगडे, पुनीत जोशी, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, संदीप खर्डेकर, शाम देशपांडे, माधुरी सहस्रबुद्धे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले , हिंदू संस्कृतीत शास्त्रीय नृत्य कला आणि लोककलेच्या साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण यातूनच अनेकांना मानसिक समाधान मिळते. आपल्या संस्कृतीचे महत्त्व ओळखूनच आगामी काळात अनेक परदेशी नागरिक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे कळेल प्रोत्साहन देणे ही आपलं कर्तव्य आहे.
ते पुढे म्हणाले की, कोथरुड हे संस्कृतीचे माहेरघर आहे. त्यामुळे इथे नृत्यकलेच्या संवर्धनासाठी नृत्यसंकुल उभारण्याची मागणी आहे. आयोजकांनी नृत्य संकुल उभारण्यासाठी जागेचा शोधा घ्यावा. पालकमंत्री नात्याने त्यासाठी सर्वतोपरी मदत करु. तसेच लवकरच नृत्यसंकुल उभारण्यासाठी प्रयत्न करु, त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिले. तसेच राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावर शास्त्रीय नृत्य कलाविष्कार सादर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करु, अशी ग्वाही दिली.
प्रसिद्ध नृत्यांगना मनिषा साठे म्हणाल्या की, पालकमंत्री हे कलाकारांच्या पाठीशी नेहमीच उभे असतात. त्यामुळे नृत्यवंदना हा अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम होतोय. मात्र, असाच कार्यक्रय संपूर्ण देशात सर्वत्र झाला पाहिजे. विशेष करुन कर्तव्यपथावर सादर करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
नृत्यवंदना कार्यक्रमात ७५० नृत्यकलाकार सहभागी झाले असून, २४ समुहांनी नृत्यविष्कार सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुनीत जोशी यांनी केले. तर सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी केले.