हिंजवडी आयटी पार्क, माण, मारुंजी परिसरातील समस्यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी

पुणे : राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी, माण, मारुंजी या भागाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी हिंजवडी फेज-१ ते माण रस्ता, माण फेज-३ ते मेट्रो स्टेशन कारशेड रस्ता, माण फेज-३ ते मेगापोलीस रस्ता, भोईरवाडी रस्ता, हिंजवडी फेज-२ ते डोहेलर कंपनी रस्ता, हिंजवडी ते मारुंजी रस्ता टी जंक्शन या रस्त्यांची पाहणी केली.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्ते मंजूर होऊनही ते रस्ते अद्याप झालेले नाहीत. पाण्याचे नैसर्गिक स्रोत बुजवण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते. त्याचबरोबर या भागात वीज पुरवठा देखील सतत खंडित होत आहे. या भागात अनेक नवीन प्रकल्प सुरू असून त्यांच्याकडून नियमांचा भंग होत असल्यामुळे नागरिकांना ध्वनी प्रदूषण आणि इतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून प्रचंड त्रास आणि मनस्तापही सहन करावा लागत आहे. या भागातील वाहतुकीची समस्या देखील कायम आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक पायाभूत सुविधांची देखील दुरावस्था झालेली आहे आदी समस्या उपस्थित नागरिकांनी मांडल्या.

हिंजवडी येथे देशातील महत्वाचे आयटी पार्क असल्यामुळे येथे अनेक नामांकित कंपन्या आणि हजारो तज्ज्ञ इंजिनियर कार्यरत आहेतं त्यांना या समस्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत लवकरच पुणे जिल्हाधिकारी, पीएमआरडीए आणि एमआयडीसी यांची संयुक्त बैठक घेऊन या समस्या सोडवण्याबरोबरच आगामी काळात समस्या टाळण्यासाठी उपाययोजना यावर चर्चा करण्याचे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंती यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, प्रशासकीय अधिकारी, नागरिक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  बालेवाडी लक्ष्मीमाता ते ब्राऊरीया सोसायटी बालेवाडी मुख्य रस्ता लवकरच होणार पुर्ण