मुंबई : अन्न धान्य वितरणातील गैरप्रकार टाळले जावेत आणि कारभार सुरळीत व्हावा, याकरीता पुणे शहरासाठी पूर्णवेळ रेशनिंग ऑफिसरची (अन्नधान्य वितरण अधिकारी) नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत आज (सोमवारी) बोलताना केली.
विभागातील पब्लिक लॉगिन मध्ये ऑनलाईन काम करताना आरसीएमएस ही साईट सुरळीत चालत नाही आणि ती खूप स्लो असते आणि बऱ्याचदा बंदही असते, त्यामुळे नवीन रेशन कार्ड काढणे, त्यामध्ये दुरुस्ती करणे अशी नागरिकांची कामे होत नाहीत, अशी माहिती शिरोळे यांनी सभागृहाला दिली.
तसेच नुकतेच पुणे शहरातील काही रेशन दुकानातून ग्राहकांना सिमेंटमिश्रित गहू आणि तांदूळ वितरीत करण्यात येत असल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला. असे प्रकार सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ खेळणारे आहेत, असे आमदार शिरोळे यांनी सभागृहात बोलताना सांगितले.
पुणे शहरासाठी पूर्ण वेळ रेशनिंग ऑफिसर (एफ डी ओ) उपलब्ध नसल्यामुळे देखील असे गंभीर प्रकार घडत आहेत. नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शासनाने पूर्णवेळ रेशनिंग ऑफिसर नेमावा आणि पुण्यातील रेशनिंग ऑफिसचा कारभार सुरळीत करावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.