औंध : औंध पुणे येथील लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंढे सांस्कृतिक भवन येथे सीनियर सिटीजन असोसिएशन ऑफ औंध च्यावतीने ‘गाऊ कथा तुकोबांची’ जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवन चरित्राच्या गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमला भाजप प्रवक्ते ऍड. डॉ. मधुकर मुसळे, नगरसेविका सौ. अर्चना मुसळे, माजी नगरसेविका सौ. रंजना मुरकुटे उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज यांचा ‘जगतगुरू तुकाराम महाराज’ होण्याचा प्रवास या कार्यक्रमातील भावगीतातून सादर केला गेला. सतीश काळे यांची गीत रचना तर डॉ. सलिल लाटे यांचे संगीत, ‘एकत्र’ या समूहाच्या भावपूर्ण सादरीकरणाने श्रोते हेलावून गेले. डॉ. सलिल लाटे यांचे गायन, निवेदन आणि संवादिनी वादन, सुनिता गानू यांचे गायन, निवेदन आणि टाळ वादन तर धनश्री बेडेकर यांच्या तबला आणि दिमडी वादनाने सर्व वातावरण भक्तिमय झाले.
सिनिअर सिटिझन्स असोसिएशन ऑफ औंध चे अध्यक्ष डॉ. रमेश वझरकर, कार्यवाह दिलीप फडके यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. कार्यकारणी सदस्य आणि बहुसंख्येने सभासद उपस्थित होते. श्रीमती अपर्णा देशपांडे यांनी आभार मानले.























