पुणे: भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उद्योग प्रवाह’ या विषयावर माहितीपूर्ण सेमिनारचे आयोजन करण्यात आले. संगणक अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थिनीसाठी हे सत्र आयोजित करण्यात आले होते.
या सत्रासाठी आय बी एम कंपनीचे उपाध्यक्ष आणि ग्लोबल हेड मा. श्री. अजय वाळगुडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपल्या प्रभावी सादरीकरणात त्यांनी उद्योगांमधील एआयच्या वाढत्या उपयोगाबाबत सांगत विद्यार्थिनींना नव्या संधींची दिशा दाखवली. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे महत्त्व, दर्जेदार डेटाची आवश्यकता आणि सॉफ्ट स्किल्सची उपयुक्तता यावर त्यांनी विशेष भर दिला. ‘जेन्टिक एआय’ या नव्या संकल्पनेचीही ओळख करून देत त्यांनी विविद्यार्थिनींना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाकडे वळण्याची प्रेरणा दिली.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव म्हणाले, “अशा प्रकारची सत्रे विद्यार्थिनींच्या ज्ञानात केवळ भर घालत नाहीत, तर त्यांना उद्योगविश्वाच्या वास्तवाशीही जोडतात.” त्यांनी पुढे सांगितले की, “विद्यार्थिनींना अभ्यासक्रमापुरता विचार न करता, नव्या कल्पनांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. अशा कार्यक्रमांमुळे त्यांच्यातील आत्मविश्वास आणि उद्योजकतेची भावना बळकट होते.”
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. एस. पी. कदम, प्रा. के. एस. सावंत आणि प्रा. रोशना सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थिनींनी या सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांनी वक्त्याशी संवाद साधत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील घडामोडी आणि संधींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळवली.
या सत्राच्या माध्यमातून महाविद्यालयाने तंत्रज्ञानातील आधुनिक घडामोडी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची आणि उद्योगांशी दृढ संपर्क साधण्याची आपली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली.





















