मुंब
ई: केंद्र सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग मुक्त भारत’ हा संकल्प निश्चित केला आहे. त्याचे पालन करण्यासाठी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने १२ ते २६ जून २०२३ या कालावधीत "नशा मुक्त भारत पंधरवडा" जाहीर केला आहे.
अंमली पदार्थांच्या (ड्रग्स) दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याबाबत सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे उपस्थित होते. सचिव श्री.भांगे म्हणाले, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. २६ जून या जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाचे औचित्य साधून जनजागृती करण्यासाठी रॅली, परिसंवाद, कार्यशाळा, ई-प्रतिज्ञा मोहिमा इत्यादीद्वारे विविध कार्यक्रम घेण्यात यावेत. कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य घेण्यात यावे. "नशा मुक्त भारत" चे स्वप्न साकार करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात यावा, असेही सचिव श्री.भांगे यांनी सांगितले
.