मुंबई : बांधकामाचा राडारोडा टाकून शहर आणि भोवतालच्या टेकड्या विद्रुप करण्याचे प्रकार वाढले आहेत. सरकारने ते थांबवावेत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (सोमवारी) विधानसभेत बोलताना केली.
शहराचा विस्तार वेगाने होतोय. बांधकामेही वेगाने होत आहेत. या बांधकामांवरील राडारोडा टेकड्यांवर टाकला जातोय. ठेकेदार हा राडारोडा टाकत आहेत. राडारोड्यामुळे टेकड्या विद्रुप होत आहेत. याकरीता मंत्री महोदयांनी सर्व वन अधिकाऱ्यांना सांगून याबाबतचा अहवाल मागवावा आणि कारवाई करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.
टेकड्यांचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी आमदार शिरोळे यांनी केलेल्या मागणीला वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. वन खात्याकडून टेकड्यांवरची माती काढू दिलीच जाणार नाही. मोठमोठ्या शहरांमधून जुने बांधकाम पाडल्यावर राडारोडा टाकण्याचे काम टेकड्या आणि इतरत्र होत आहे. या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी राडारोडा विल्हेवाट यंत्रणा उभी करण्याचे काम चालू झाले आहे. शहरांच्या हद्दीपाशी वनखाते, पोलीस खाते आणि महसूल खाते यांचे अधिकारी देखरेख ठेवतील. सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. राडारोडा वन विभागाच्या जमीनीवर तसेच अन्यत्र टाकू दिला जाणार नाही, हे स्पष्ट करतो, असे आश्वासन गणेश नाईक यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना दिले.