लवळे ग्रामपंचायतच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभारला कंटाळून ग्रामपंचायतच्या चार सदस्यांनी दिला राजीनामा; पत्रकार परिषदेत केले गंभीर आरोप

लवळे : मुळशी तालुक्यातील लवळे ग्रामपंचायतच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभारला कंटाळून ग्रामपंचायतच्या चार सदस्यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. अजित नामदेव चांदीलकर, किमया गणेश गावडे, राहुल आनंदा खरात आणि राणी रामदास केदारी यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामसभेचा त्याग करत आपले राजीनामे दिले. सरपंच रणजीत तानाजी राऊत आणि ग्रामपंचायत सदस्य संजय वसंत सातव या दोघांनी मिळून  जातीची आणि समाजाची विभागणी करून आपणास कायमच दुय्यम वागणूक दिली तसेच या सदस्यांनी आपापल्या वार्डात सुचवलेली विकास कामे न करता हे दोघे  मनमानी कारभार करत राहिले. प्रत्येक कामात नावापुरता ठेकेदार नेमून त्यांच्या नावाखाली यांनीच कामे केली ती कामे सुद्धा निकृष्ट  दर्जाची झाली आहेत. यामध्ये ग्रामविकास अधिकारी विठ्ठल साकोरे हे देखील सामील असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेमध्ये अजित चांदीलकर, किमया गावडे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य धोंडीबा केदारी यांनी सांगितले.

ग्रामदैवत श्री रोटमलनाथ मंदिराचा सभामंडप आणि ओटा गणेश तरुण मंडळ चिंचेचापार येथील पत्रा शेड या कामांमध्ये प्रत्यक्ष खर्चापेक्षा जास्त खर्च दाखवून आणि गावच्या तालीम दुरुस्तीमध्ये जुन्याच लोखंडी साहित्याला नवीन रंगकाम करून नवीन लोखंडी साहित्याच्या  किमती प्रमाणे बिल काढले गेले. गावातील कोणत्याही विकास कामांमध्ये ग्रामपंचायत सदस्य संजय वसंत सातव यांच्या जेसीबी द्वारे काम करून दोन तास काम झाले तरी आठ तास काम झाल्याचे चलन बनवून  पैसे उकळले. कोणत्याही विकास कामाचे ऑनलाईन टेंडर झाल्यानंतर ठेकेदारांना स्थळ पाहणी अहवाल ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्या सहीने दिला जातो परंतु फाटक आणि सोंडकर यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठेकेदाराला ग्रामसेवक विठ्ठल साकोरे स्थळ पाहणी अहवाल देत नाही. हे दोन ठेकेदार फक्त  नावालाच असून प्रत्यक्षात काम करणारा मात्र या सर्व भ्रष्टाचारात सहभागी असलेला एक ग्रामपंचायत सदस्य  असल्याचे अजित चांदीलकर , किमया गावडे यांनी सांगितले. राऊंड टेबल ६५ या संस्थेचा सीएसआर फंड आणि लवळे ग्रामपंचायत यांच्या निम्म्या निम्म्या खर्चातून शाळेच्या नवीन इमारतीचे सुरू असलेले काम आणि मोरया गणपती रस्ता ही कामे निकृष्ट दर्जाची  आहेत. ग्रामपंचायत सदस्य  शिवराम सातव याच्या पाहुण्याच्या शेळी फार्म कडे  जाण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून रस्ता केला   असून याचीही आम्हा सदस्यांना कल्पना नाही. कोणत्याही विकास कामाबाबतची माहिती ग्रामविकास अधिकारी साकोरे यांना विचारले असता, माहिती अधिकारात अर्ज करा तेव्हा माहिती देतो असे उर्मट उत्तर कायम दिले जात असल्याचेही वरील सदस्यांनी सांगितले.

See also  भाजपा खासदार गिरीश बापट यांचे वयाच्या 74 व्या वर्षी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये निधन

सिम्बायोसिस शिक्षण संस्थेकडे ३ कोटी 31 लाख रुपये, गोल्फ क्लब कडे दोन कोटी 45 लाख रुपये, नॉलेज सिटी कडे १ कोटी तीन लाख रुपये आणि राऊत सिरम कडे 35 लाख 54 हजार रुपये इतका कर थकबाकी असून, सामान्य नागरिकांकडे कर वसुली चा तगादा लावणारे ग्रामसेवक विठ्ठल साकोरे या संस्थांबाबत कारवाई करत नाहीत. तरीही या संस्थांना साकोरे वेगवेगळ्या प्रकारचे ना हरकत दाखले देतात, सामान्य नागरिकांची अडवणूक करतात असा आरोप कमलेश सटाले यांनी केला. यावर कर न भरलेल्या संस्थांवर न्यायालयात खटला चालू आहे. मी माझ्या सहीने कोणताही ना हरकत दाखला दिलेला नाही.सरपंचाने दिला असल्यास मला कल्पना नसल्याचे आणि मासिक सभेत विकास कामांची चर्चा केली जाते, सदर कामांचा ठराव झाल्याशिवाय कोणतेही काम दिले जात नाही माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे  साकोरे यांनी सांगितले. लवळेश्वर महादेव देवस्थानच्या जागेबाबत धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात वाद सुरू असून या जागे लगत ऑक्सफर्ड कंपनीने प्लॉटिंग करून विक्री सुरू केली आहे. ऑक्सफर्डच्या या प्लॉटिंग च्या जागेत जाण्यासाठी त्यांचा स्वतंत्र रस्ता नाही. तरीही महादेव देवस्थानच्या जमिनीमधून या प्लॉटिंगमध्ये जाण्यासाठी बेकायदेशीर रित्या रस्ता तयार करून पीएमआरडीए च्या एन.ए. विभागाची आणि प्लॉट घेणाऱ्या प्लॉट धारकांची ऑक्सफर्ड कडून फसवणूक केली जात आहे, याबाबत लवकरच न्यायालयात जाणार असल्याचे लवळेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट चे सदस्य अजित शितोळे आणि सचिव धोंडीबा केदारी, शिवराय पतसंस्थेचे उपाध्यक्ष विलास सुर्वे  यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर ग्रामपंचायतला निधी खर्च करता येतो का? या प्रश्नाचे उत्तर देताना नागरी सुविधा योजनेअंतर्गत रस्ता केला असल्याचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याकडून रस्त्याची गुणवत्ता तपासून झाल्यावरच मी सही करतो,आणि जेसीबीच्या कामाचे चलन पाहूनच बिल काढतो. माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे असून मी नियमानुसार काम करत असल्याचे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल साकोरे यांनी सांगितले.

See also  वरसगाव धरणावर महाकाय मगर आढळल्याने घबराट; तुडुंब भरलेल्या वरसगाव धरणावरील स्थिती

सदस्य पदाचे राजीनामे एवढ्या उशिरा का दिले या लवळे ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना,गावाचा विकास होतोय  असे दिसून येत होते.मात्र विकासाच्या नावाखाली गावाचा प्रचंड पैसा लुटला जात आहे. कोणत्याही विकास कामाबद्दल ग्रामपंचायत मध्ये सभासदांशी कुठलीही चर्चा केली जात नाही, आमच्या फक्त सह्या घेतल्या जातात.असे निदर्शनास आल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे आणि गावाच्या हितासाठी तसेच हा झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी लढा देणार असल्याचे अजित चांदीलकर आणि किमया गावडे यांनी पुणे बुलेटीन शी बोलताना सांगितले.