पुणे : आम्ही आहोत पुणे शहरात राहणारे माजी आमदार, आज आम्ही राजकारणात सक्रीय आहोत असा आमचा दावा नाही, पण कधीतरी आम्ही आमदार होतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत सदस्य म्हणून बसत होतो. आम्ही कोणत्या राजकीय पक्षातर्फे जनतेचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेत बसत होतो ही बाब गौण आहे. आमच्या काळात विधानसभेचे सभागृह राज्यातील सर्वोच्च पवित्र असे मुक्त संवादाचे, प्रामाणिक मतभेद व्यक्त करण्याचे तीर्थ स्थळ होते, हे सर्वोच्च सभागृह पूर्णपणे सुरक्षित होते, आता आमची इच्छाच मेली ! अशी उद्विग्न भावना पुण्यातील माजी आमदारांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र विधीमंडळात गुंड व गुन्हेगारांच्या हैदोसा विरोधात पुणे स्थित ज्येष्ठ माजी आमदारांची युवक क्रांती दलाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या प्रसंगी डॉ. कुमार सप्तर्षी, ॲड. वंदना चव्हाण, ॲड. जयदेवराव गायकवाड, बाळासाहेब शिवरकर, ॲड. एल. टी. सावंत,, संयोजक राहुल डंबाळे आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सप्तर्षी म्हणाले, महाराष्ट्रात राहणाऱ्या १२ ॥ कोटी जनतेने आपल्या मतदानाद्वारे विधानसभेत लोकांच्या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी २८८ लोकप्रतिनिधी निवडून दिलेले असतात, त्यांनी लोकांच्या सुखदुःखाचे, भावनांचे, सोयी-गैरसोयीचे प्रतिनिधीत्व करायचे असते, या कर्तव्याचा आम्हाला सातत्याने जाणीव असायची, त्यासाठी आम्ही फक्त माध्यम आहोत, हे आम्ही लक्षात ठेवायचो. सभागृहाचे खरे मालक राज्यात राहणारे नागरिक आहेत, जनहिताला मारक कायदे या कायदेमंडळात संमत होणार नाहीत हे डोळयात तेल घालून पाहायचे, हे अल्पमतातल्या विरोधकांचे कामच असते, तसेच ज्यांनी विधीमंडळात बहुमत प्राप्त केले असेल, त्यांनी सरकार स्थापन करून जनहिताचे रक्षण करणे, जनताभिमुख धोरणे अंमलात आणून राज्याचा विकास करणे, ही कामे अपेक्षित असतात,
सध्या मात्र गंगा उलट्या दिशेने वाहू लागली आहे. आमदार संवादापेक्षा एकमेकांना साता जन्माचे वैरी मानू लागले आहेत, आमदार गोपीचंद पडळकर हे सरकार पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात. ते मुख्यमंत्र्याचे खास, विशेष लाडके आहेत. सातत्याने विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना अर्वाच्य भाषेत लाखोली वाहणे हे त्यांच्यावर सोपविलेले काम ते निष्ठेने पार पाहत असतात, १६ जुलै २०२५ रोजी त्यांनी कळस गाठला, विधानसभेच्या सुरक्षित परिसरात ते नामचीन गुन्हेगारांना घेऊन आले, त्या गुंडांमार्फत विरोधी पक्षांचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यावर त्यांनी जोरदार हल्ला चढविला, सारे आमदार या घटनेचे प्रेक्षक तर होतेच पण ही घटना कॅमेरात टिपल्यामुळे वृत्त वाहिन्यांमार्फत देशभर लोकांना याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य लाभले.
लोकशाहीचे मंदिर तोच उद्ध्वस्त करू शकतो, ज्याला लोकशाही अमान्य आहे, लोकशाही प्रणालीत सत्तारूढ पक्षाने विरोधी पक्षाला वैरी मानायचे नसते. परंतु महाराष्ट्राचे सरकार तिकडमबानी करून संधिसाधू प्रवृत्तींना एकत्र करून स्थापन झाले असल्यामुळे ते विरोधक संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत आहे, हे स्पष्ट झाले आहे. आजचे विधीमंडळ बरखास्त करून नव्याने निवडणूक घेणे आवश्यक असल्याचे दिसते.
रामदास फुटाणे म्हणाले, आधी राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्यात आले जाता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी सरकार ताब्यात घेतलेले दिसते, विरोधी पक्षांच्या मुसक्या बांधलेल्या, अशा अवस्थेत लोकशाहीच्या पवित्र मंदिराला उद्ध्वस्त करणारांचा आम्ही एकमुखाने तीव्र निषेध करतो आणि तो जनतेच्या कोर्टात नोंदवित आहोत. सध्या, लोकशाहीचे, प्रतिनिधीशाहीत रूपांतर झाले आहे, जनतेच्या प्रश्न वर आम्ही सभागृहात भान मात्र कुणाला मारणे किंवा मारनायर लोक पालन अ काळात नव्हते.
ॲड. वंदना चव्हाण म्हणाल्या, राज्याला आज गृहमंत्री आहेत की नाही असा प्रश्न पडत आहे, असतील तर कारवाई का होत नाही हा गंभीर पविषय आहे. राजकारण करणारे असे वागत असतील तर जनतेने काय करायचे. राज्यात शिक्षण, शेती, रोजगार हे गंभीर विषय आहेत मात्र विधिमंडळ मध्ये होत असलेल्या गोंधळात हे विषय मागे पडत चालले आहेत, परिणामी महाराष्ट्राची अधोगती होत असल्याचे दिसते.
बाळासाहेब शिवरकर म्हणाले, आज सभागृहात महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावण्याचे काम सुरू आहे. आमदारांच्या काही समस्या, तक्रार असतील तर त्या एका समिती मार्फत सोडवल्या जातात, आज सत्ताधारी आमदार कुणाला मारहाण करतात हे चित्र विदारक आहे. राज्याच्या संविधानिक सभागृहाने जनतेला दिशा देण्याचे काम करायचे असते याचा विसर आजच्या राजकीय मंडळींना पडला आहे का असा सवाल उपस्थित होतो असेही शिवरकर म्हणाले. .