भारतात प्रथमच पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन

पुणे: भारतात पहिल्यांदाच पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया, पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व एजीसी स्पोर्ट्स व पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलोत्सव पॅरा एडिशन – २०२५’ क्रीडास्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज  क्रीडा संकुल,म्हाळुंगे,पुणे येथे ११ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पार पडणार आहे, अशी माहिती पद्मश्री व
पॅरालिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकावणारे मुरलीकांत पेटकर, आयोजक आकाश कुंभार आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज चे कार्यकारी अधिकारी मनोहर मुकुंद जगताप, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज चे संचालक अजय मुकुंद जगताप यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

या पत्रकार परिषदेला आयोजक संस्थेचे रफिक खान, कपिल मिसाळ, विष्णू धोत्रे ,किरण लोहार आदी पदाधिकारी व आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे अधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये पॅरा नेमबाजी, पॅरा जलतरण, पॅरा ॲथलेटिक्स व व्हिलचेअर बास्केटबॉल या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील कामगिरीतून खेळाडूंची अल ऐन २०२५ विश्व चषक आणि अन्य आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड केली जाणार आहे.

या स्पर्धेत टोकियो व पॅरिस पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेती अवनी लेकरा, कांस्यपदक विजेती मोनो अग्रवाल,रूबिना फ्रान्सिस यांच्या सह १३ पॅरालिम्पियन ५० आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू व देशभरातून ६०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे १५ आंतरराष्ट्रीय पंच, १५ राष्ट्रीय पंच, १५ अधिकारी व ५० स्वयंसेवक काम पाहणार आहेत. या स्पर्धेमधून २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत अल- इन दुबई येथे होणाऱ्या पॅरा नेमबाजी विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड होईल.

अल- इन दुबई दौऱ्याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे. त्यामुळे भारतीय संघाची स्थान मिळवण्यासाठी ह्या स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती होतील. पॅरा जलतरण मध्ये १४ विभागात स्पर्धा होणार आहे. पॅरा ॲथलेटिक्स मध्ये ४९ विभागात स्पर्धा होणार आहे.

एजीसी स्पोर्ट्समुळे व त्यांच्या पुढाकाराने दिव्यांग खेळाडूंना खेलोत्सव पॅरा एडिशन स्वरूपात एक नवीन व्यासपीठ मिळाले आहे, असा दावा संयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे.

एजीसी स्पोर्ट्स ही क्रीडा वाहिनी आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचा भाग असून विशेषतः ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्राला व ग्रामीण खेळाडूंना, दिव्यांग खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देऊन प्रोत्साहित करणे, हे या वाहिनीचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

See also  कबड्डीतील महिला खेळाडूंवर अन्याय करणाऱ्या सहकार्यवाह बाबुराव चांदेरे यांना बडतर्फ करण्याची खासदार गजानन कीर्तिकर यांची मागणी