कोंढवा : ट्रिनिटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळांतर्गत, विद्यार्थी विकास आणि कल्याण मंडळ अधिष्ठाता प्रा.डॉ हेमंत देशमुख यांचे महाविद्यालयामध्ये ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’ या विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासावर आधारित मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कल्याणराव जाधव शैक्षणिक संकुलाच्या आर्किटेक्ट हॉलमध्ये शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी कल्याण व विकास विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉक्टर हेमंत देशमुख यांनी “गान, ज्ञान आणि विज्ञान” या त्रीसूत्रीचा आधार घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वतःची ओळख निर्माण करून स्वतःची जबाबदारी स्वतःच घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी स्वतःची जबाबदारी घ्यायला शिका, आपल्या आई-वडिलांचा आदर करा, आपल्या शिक्षकांचा आदर करा, व्यसनांपासून दूर राहा अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांनी आपण घेत असलेल्या शिक्षणाचा मूळ उद्देश लक्षात घेतला पाहिजे तसेच, मी कोण आहे? याची ओळख करून देणारे शिक्षण आपण घेतलं आहे का? हा प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वतःला विचारायला हवा असे आवाहनही त्यांनी केले. येणाऱ्या काळामध्ये मुलांनी स्वतःच्या आत्मविश्वासावर काम केलं पाहिजे, वाईट विचारांपासून दूर राहून चांगल्या विचारांची संगत केली पाहिजे असा मोलाचा सल्लाही त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दांवर लक्ष दिले पाहिजे, कारण, शब्द कृतीत उतरतात विद्यार्थ्यांनी आपल्या कृतींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण, कृती ही सवय बनते, विद्यार्थ्यांनी आपल्या सवयींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण, सवयी ह्या आपलं चरित्र व्यक्त करतात, विद्यार्थ्यांनी आपल्या चारित्र्यावर लक्ष केंद्रित करायला हवं कारण, आपले चारित्र्य हे आपले भाग्य लिहीत असतं असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना, ध्यान म्हणजे झोप नव्हे तर वीस मिनिटांमध्ये केलेले ध्यान हे चार तासांच्या झोपेबरोबर आहे असा उपदेशही त्यांनी केला. ‘शांताबाईचे’ गाणे ऐकण्यापेक्षा शांता शेळके यांच्या कविता ऐका. ‘सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?’ ऐकण्यापेक्षा सोनू निगमचे ‘हर घडी बदल रही है, धूप जिंदगी’ हे गीत ऐका. जीवन हे क्षणभंगुर आहे, चांगलं जगा. स्वतःच्या ध्येयासाठी लढा. मनाचे सामर्थ्य ओळखा. कुठलच शिक्षण हे वाईट नसतं म्हणून शिक्षण घ्या. कौशल्य आत्मसात करा. एकमेकांना मदत करत शिक्षणाचा आनंद घ्या आणि हे सर्व करताना जागरूकता ठेवा. ज्याची समाजाला गरज आहे ते शिक्षण घ्या, आपल्या जीवनाचा उद्देश ठरवा, आपली ध्येय ठरवा, आपली सजग वृत्ती जपायला शिका, तुमची वृत्ती तुमची उंची वाढवेल, आपली योग्यता सिद्ध करा, आपला कृती कार्यक्रम निश्चित करून आपले ध्येय गाठा असा सल्लाही त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विनायक हिरे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये प्रा. मयुरी जाधव, प्रा. रचना भागवत प्रा. पूर्वा काणे, प्रा. सचिन आल्हाट ,शिक्षकेतर कर्मचारी निलेश कामठे, अमोल जाधव ,ओंकार जाधव, प्राजक्ता सोनवळकर, किरण हांडे, भाऊलाल सरवडे यांनी आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. घोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.धनाजी जाधव यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये सत्तारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी आपला नोंदवला.