जलसंपदा क्षेत्राचा आढावा विषयक प्रशिक्षण कार्यशाळेस सुरूवात
राष्ट्रीय जल अकादमी, पुणे येथे ५ दिवसीय प्रशिक्षणात देशभरातील प्रतिनिधी सहभागी

पुणे : केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय जल अकादमी (NWA), केंद्रीय जल आयोग (CWC), पुणे यांच्या वतीने ‘भारतातील जलसंपदा क्षेत्राचा आढावा’ या विषयावर ५ दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा आजपासून सुरू झाली आहे. ४ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत होणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये देशभरातील स्वयंसेवी संस्था, मीडिया प्रतिनिधी व नागरी समाजाचे सुमारे ३५ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. डी. एस. चासकर, मुख्य अभियंता आणि प्रमुख, राष्ट्रीय जल अकादमी, पुणे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री. चासकर यांनी जलसंपदेसंदर्भातील मुद्द्यांवर जनजागृती, धोरणनिर्मिती आणि जनतेच्या सहभागासाठी मीडिया, स्वयंसेवी संस्था व नागरी समाज यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, “भारताच्या भौगोलिक, सामाजिक व हवामानीय वैविध्यामुळे जलव्यवस्थापनाच्या अडचणीही अनोख्या आहेत. कोकण किंवा ईशान्य भारतासारख्या अतिवृष्टीच्या भागातील उपाययोजना राजस्थानसारख्या कोरडवाहू भागात लागू शकत नाहीत. त्यामुळे प्रादेशिक गरजेनुसार उपाययोजना करणे गरजेचे आहे.”

कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रतिनिध्यांमधील विविधतेचा उल्लेख करत, ते म्हणाले की, “देशभरातील वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील प्रतिनिधी एकत्र आले असले, तरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी योगदान देण्याचा समान हेतू सर्वांना जोडतो.” त्यांनी मीडिया व नागरी संस्थांना लोकशाहीचे चौथे व पाचवे स्तंभ संबोधून त्यांच्या पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सहभागिता यातील भूमिकेचे कौतुक केले.

या प्रशिक्षणामध्ये NWA मधील अनुभवी प्रशिक्षक व केंद्रीय जल आयोग तसेच अन्य संस्थांतील तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागी होत आहेत. जलस्रोतांचे उपलब्धता व वितरण, पाण्याची गुणवत्ता, सिंचन विकास, राज्यघटनेतील पाणीविषयक तरतुदी, भूगर्भजल विकास, पूर व्यवस्थापन अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन होणार आहे.

कार्यक्रमाचा एक प्रमुख आकर्षणबिंदू म्हणजे हिवरे बाजार या महाराष्ट्रातील गावाची भेट. पाणीटंचाईवर मात करत जलसंवर्धनाच्या प्रभावी उपक्रमांमुळे हे गाव देशासमोर पाणीसंपन्नतेचे यशस्वी उदाहरण ठरले आहे. याशिवाय CWPRS पुणे, खडकवासला धरण, जलगुणवत्ता प्रयोगशाळा, वरील कृष्णा विभागाची हवामान केंद्रे यांनाही भेटी देण्यात येणार आहेत.

See also  शासनाच्या फसवेगिरीमुळे समाविष्ट गावांतील नागरिकांवर भरमसाठ मिळकतकराची टांगती तलवार : ८ एप्रिल पासून सिंहगड रस्त्यावर सत्याग्रह आंदोलन करण्याचा हवेली तालुका कृती समितीचा इशारा

या प्रशिक्षण कार्यशाळेचे समन्वयक म्हणून श्री. मिलिंद पानपटील, संचालक, राष्ट्रीय जल अकादमी कार्यरत आहेत.