पुणे: भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात “ओरेकल अपेक्स प्रमाणपत्र : कौशल्य वृद्धी, करिअर उन्नती आणि प्रशिक्षण मार्गदर्शन” या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थिनींना आधुनिक तंत्रज्ञान, कमी कोडींग प्रणाली, करिअरच्या संधी आणि प्रमाणपत्र प्रशिक्षण याविषयी माहिती मिळावी, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
या परिसंवादासाठी अनेक नामांकित तंत्रज्ञ आणि उद्योगतज्ज्ञ उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून रिचर्ड दळवी, संतोष कुमार, भरत भाटिया, अरुण भारद्वाज, केन्वी शाह आणि मलिका मिश्रा यांनी विद्यार्थिनींना मौल्यवान मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर मा. डॉ. पतंगराव कदम यांना अभिवादन करण्यात आले आणि ज्ञानाची देवता सरस्वती मातेची पूजा करण्यात आली. भारती विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये आणि शिक्षणाच्या प्रसारात त्यांचे मोठे योगदान आहे, याची आठवण या वेळी सर्वांनी ठेवली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “ओरेकल एपीईएक्स ही संगणक प्रणाली अत्यंत वेगवान आणि प्रभावी आहे. कमी कोडींगमध्ये उत्कृष्ट प्रणाली विकसित करता येते, त्यामुळे भविष्यातील करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थिनींनी सतत नवीन कौशल्ये आत्मसात करणे आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आवश्यक आहे.”
यानंतर तांत्रिक सत्रांना सुरुवात झाली. रिचर्ड दळवी यांनी ओरेकल अपेक्स प्रणाली कशी कार्य करते, ती शिकण्याचे फायदे आणि तिचा उद्योगात कसा उपयोग होतो यावर माहिती दिली. त्यांनी ओरेकल अपेक्स वापरून यशस्वी झालेल्या काही मोठ्या प्रकल्पांची उदाहरणे दिली, ज्यामुळे विद्यार्थिनींना या क्षेत्रातील संधींबद्दल अधिक आत्मविश्वास मिळाला.
यानंतर संतोष कुमार यांनी ओरेकल एपीईएक्स ही कमी कोडींगमध्ये तयार होणारी संगणक प्रणाली कशी कार्य करते हे स्पष्ट केले. त्यांनी कोडींगशिवाय सहजपणे ॲप्लिकेशन तयार करता येते, माहिती साठवण्याचे आणि व्यवस्थापन करण्याचे तंत्र, ओआरडीए आणि पीडब्ल्यूए यासारख्या संकल्पनांची माहिती दिली. त्यांनी थेट उदाहरणासह एका मोबाईल ॲप्लिकेशनची निर्मिती करून दाखवली, त्यामुळे विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
यानंतर भरत भाटिया यांनी ओरेकल एपीईएक्स वापरून विद्यार्थिनींना उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधींविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “ओरेकल तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहेत आणि भविष्यात त्याची मागणी अधिक वाढणार आहे.”
यानंतर केन्वी शाह यांनी “ओरेकल एपीईएक्स हॅकाथॉन” म्हणजेच ठराविक वेळेत संगणक प्रणाली विकसित करण्याच्या स्पर्धेविषयी माहिती दिली. विद्यार्थिनींनी अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन तांत्रिक कौशल्य वाढवावे आणि आपले नाव उद्योगक्षेत्रात चमकवावे, असा सल्ला त्यांनी दिला.
महिला दिनाचे औचित्य साधून मलिका मिश्रा यांनी स्त्री सशक्तीकरणावर प्रभावी भाषण केले. त्यांनी सांगितले की, “महिलांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे.” त्यांनी स्वतःच्या अनुभवांमधून विद्यार्थिनींना प्रेरणा दिली आणि संघभावना, मेहनत आणि चिकाटीने कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, हे पटवून दिले. यावेळी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिपाली गोडसे यांनी महिला दिनानिमित्त प्रभावी आणि अभ्यासपूर्ण भाषण केले.
परिसंवादाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. सोनाली कदम आणि प्रा. डॉ. विजया पवार यांनी उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाचे सुंदर आणि प्रभावी सूत्रसंचालन प्रा. कल्याणी चौधरी, प्रा. डॉ. सिमी खान, प्रा. डॉ. केतकी आणि प्रा. डॉ. विजया पवार यांनी केले. त्यांच्या मेहनतीमुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक आकर्षक आणि शिस्तबद्ध झाला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अविनाश पवार, उपप्राचार्या प्रा. डॉ. सुवर्णा चोरगे, सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
हा परिसंवाद विद्यार्थिनींसाठी अत्यंत फायदेशीर ठरला. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना ओरेकल अपेक्स प्रणाली, करिअरच्या संधी आणि भविष्यातील तंत्रज्ञान ट्रेंड याविषयी सखोल माहिती मिळाली. प्रत्यक्ष डेमो आणि संवादात्मक सत्रांमुळे विद्यार्थिनींना अधिक आत्मविश्वास मिळाला आणि नवीन कौशल्ये आत्मसात करण्यास प्रोत्साहन मिळाले.
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे हे नेहमीच विद्यार्थिनींना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आणि त्यांना उद्योगासोबत जोडण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. हा परिसंवाद त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला आणि विद्यार्थिनींना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने प्रेरणा मिळाली.
घर साहित्य/शैक्षणिक भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात ओरेकल अपेक्स प्रमाणपत्र आणि कौशल्य विकासावर आंतरराष्ट्रीय...