“तरुणांच्या उपक्रमातून साकारतेय ग्रामीण भागातलं नारळांचं गाव”
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावामध्ये नोकरीनिमित्ताने नाशिक,पुणे मुंबईस्थित राहणाऱ्या तरुणांनी एकत्र येत वृक्षारोपणाचा एक अनोखा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे.
“संकल्प गावाला सुंदर बनवण्याच्या ज्येष्ठांच्या हाताने वृक्षारोपण करण्याचा” हे ब्रीद घेऊन गावातील काही निसर्गप्रेमी तरुणांनी एकत्र येत आपल्या गावातील नोकरीनिमित्ताने मुंबई, पुणे, नगर,नाशिक, संगमनेर स्थित तरुणांनी एकत्र येत लोकवर्गणीच्या माध्यमातून गतवर्षी पाऊणे दोन लाख रुपयांची धनराशी जमा केली. या धनराशीच्या माध्यमातून साधारणतः पंधरा फूट उंचीचे नारळाची आणि काही जंगली फुलझाडे आणून गावातील वडिलधाऱ्या माणसांच्या हातून त्यांचे रोपण केले गेले. गावाला सुंदर बनवण्याच्या ह्या प्रयत्नांतून गतवर्षी लावलेली ही सर्व झाडे गावचा परिसराची शोभा वाढवत आहेत. गतवर्षी हा उपक्रम लोकसहभागातून राबवल्यामुळे आणि त्याला यश मिळाल्यामुळे सलग पाच वर्ष हा उपक्रम राबवून गावाला निसर्गरम्य सुंदर बनवण्याचा ध्यास येथील तरुणांनी घेतलेला आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये साजऱ्या होणाऱ्या जागतिक मैत्रीदिनाच्या निमित्ताने सर्वांनी स्नेहमेळाव्याच्या एकत्र येत आपल्या गावाला सुंदर बनवण्याच्या प्रयत्नातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घ्यायचे ठरवले आहे. ठरल्याप्रमाणे लोकवर्गणीतून आणि लोकसहभागातून ,श्रमदानातून हा संपूर्ण कार्यक्रम भोजदरी या गावी होणार आहे. नोकरीनिमित्ताने बाहेर पडलेल्या तरुणांच्या या अनोख्या उपक्रमाची आजूबाजूच्या गावपरिसरात कौतुक होताना दिसत असून शेजारच्या वनकुटे,आंबी आदी गावातील काही तरुणांनी देखील असाच प्रयोग आपल्या गावामध्ये राबवायचे ठरले आहे.
तरुणांच्या या उपक्रमाने गावातील ज्येष्ठांमध्येही नवी ऊर्जा संचारल्याचे दिसत आहे. एकूणच गावाला सुंदर बनवण्याचा हा उपक्रम निसर्गाचे संवर्धन करणारा असल्यामुळे सर्वच स्तरांतून भोजदरी ग्रामस्थांचे आणि तेथील तरुणांचे कौतुक आजूबाजूच्या गावांमधून कौतुक होताना दिसत आहे.हा संपूर्ण उपक्रम सेंट व्हिन्सेंट महाविद्यालय पुणे यांच्या समन्वयातून आणि अण्णासाहेब आवटे महाविद्यालय ओतूर, बाळासाहेब जाधव महाविद्यालय आळे,सीताई महाविद्यालय घारगाव आदी महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून आणि श्रमदानातून साकार होतो आहे.