पाषाण : पाषाण-सोमेश्वरवाडी-सुतारवाडी परिसरातील विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये संत तुकाराम माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन, पिण्याच्या पाण्याच्या दोन टाक्यांचं उद्घाटन आणि पाषाण वैकुंठ स्मशानभूमीचं लोकार्पण (APC प्रणाली व गॅस दाहिनी) आदीं कामांचे समावेश होता.
यावेळी पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, आमदार शंकर मांडेकर, आमदार सुनील शेळके, आमदार बापू पठारे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, राहुल बालवडकर, पुनम विधाते आदी उपस्थित होते.
पाषाण-सोमेश्वरवाडी-सुतारवाडी परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी संत तुकाराम विद्यालयाची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. ‘जेवढं ज्ञान संपादन कराल, तेवढं मोठं होता येतं ” हा संदेश उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अजित पवार यावेळी म्हणाले, विकासकामं करताना पर्यावरणाचा समतोल राखणं तितकंच महत्त्वाचं आहे. राम नदीचं पुनर्जीवन व परिसराचा नैसर्गिक वारसा जपणं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अतिक्रमण नष्ट करून पर्यावरणपूरक विकास साधला जाईल. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर आमचा भर आहे. शहरातील रस्ते रुंद करण्याची कामं, पाणीपुरवठा, स्मशानभूमी सुविधा यांसह सर्व क्षेत्रांतील विकासकामांना निधीची कमतरता भासू देणार नाही.
यावेळी पाषाण सुतारवाडी सुस महाळुंगे परिसरातील नागरिक उपस्थित होते.