शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा – स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे

पुणे : वाढीव किंमतीने खते आणि बोगस बी बियाने विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी केली. स्वराज्य पक्षाकडून वाढीव दराने खते विकणार्‍यांविरोधात स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यानंतर स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेवून सविस्तरपणे भूमिका मांडली.

छत्रपती संभाजी राजे म्हणाले,वाढीव दराने खते व बियाणे विकणार्‍या विक्रेते, डीलर व सहभागी अधिकाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. काही ठिकाणी खतांचा तुटवडा निर्माण करून कृत्रिम टंचाई देखील केली जाते अशी माहिती देखील आम्हाला मिळाली.या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाचे सरचिटणीस डॉ.धनंजय जाधव व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पुणे शहरात मार्केट यार्ड परिसरातील खत विक्री दुकानांमध्ये जाऊन युरिया खरेदी केला. ₹२६६/-  रुपयांना मिळणारी गोणी तब्बल ₹८००/- रुपयांना विकत असल्याची धक्कादायक बाब या घटनेतून आमच्या लक्षात आली आहे. या बाबत आमच्या पदाधिकाऱ्यांनी सदरील घटनेबाबत चे व्हिडिओ चित्रिकरण केलेले आहे. तसेच खरेदी केल्याचे बिल देखील मिळालेले आहे.ही घटना अतिशय धक्कादायक आहे. MRP पेक्षा जवळपास तिप्पट दराने विक्री होत असल्याची घटना अतिशय गंभीर आहे. सद्य स्थितीत राज्याला कृषी आयुक्त नाहीये हे अतिशय धक्कादायक बाब आहे. राज्यात अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांची लूट, फसवणूक सुरू आहे. या बाबत राज्य सरकारने तातडीने कार्यवाही केली पाहिजे. अशी मागणी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, उपाध्यक्ष विनोद साबळे, राजू फाले, रेश्मा गोसावी, गणेश सोनवणे, विनोद परांडे, निखिल काची आदी उपस्थित होते.

See also  भाजपाचे माजी शहर चिटणीस ज्येष्ठ पत्रकार सुनील माने यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश