मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ५६ अधिसूचित सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन सुरू करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मंत्रालयात लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या विद्यापीठाशी संबंधित सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसचिव संतोष खोरगडे, दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील विविध विद्यापीठाचे कुलगुरू व संबंधित अधिकारी उपस्थित होते. विद्यापीठाशी संबंधित ऑनलाईन सेवांबाबत सादरीकरण अनुप बाणाईत यांनी केले.
मंत्री पाटील म्हणाले की, सर्व विद्यापीठांना व महाविद्यालयांना या सेवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर राईट टू सर्विस (RTS) या टॅबखाली आवश्यक माहिती प्रदर्शित करणे अनिवार्य आहे. विद्यापीठाने डॅशबोर्डवर आलेल्या अर्जाची पडताळणी करून या सेवा विहित मुदतीत विद्यार्थ्यांना मिळाव्यात या अनुषंगाने कार्यवाही करावी. उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत ५६ सेवा ऑनलाईन करण्यात आल्या असून २० सेवा या विद्यापीठाशी संबंधित आहेत. या सेवा राज्यातील सुमारे २० लाख विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणार आहेत.
प्रत्येक महाविद्यालयामध्ये याकामी एका पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संकेतस्थळावर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. आपले सरकार संकेतस्थळावर सर्व विद्यापीठाचा डेटा एका ठिकाणी दिसेल. यामध्ये अर्ज किती आले आहेत, किती अर्ज प्रलंबित आहेत, व किती अर्जावर कार्यवाही झाली आहे याबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर दिसणार आहे. याबाबत विद्यापीठाअंतर्गत अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कुलगुरूंनी प्रत्येक आठवड्यात याचा आढावा घेणे आवश्यक आहे. सर्व विद्यापीठांनी या सेवा लवकरात लवकर सुरू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. प्रत्येक विद्यापीठाने व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे. फेक, बोगस प्रमाणपत्रावर आळा घालण्यासाठी विद्यापीठाने ब्लॉक चेन सेवा लवकरात लवकर सुरू करावी. यापुढे कोणतेही प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन सेवा विद्यापीठामार्फत देण्यात येणार आहेत त्याची माहिती ‘एसएमएस’द्वारे विद्यापीठाने कळवावी, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.