खडकवासला : काम पूर्ण होऊनही गेल्या पंधरा दिवसापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग ते हिंगणे या मार्गावरील तिसऱ्या टप्प्यातील पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते झाले. पुला दरम्यान झालेल्या अरूंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून पूल खुला करण्यासाठी विरोधी पक्षांनी केलेले आंदोलन यामुळे अनेक दिवसांपासून पुलाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
118 कोटी रुपये खर्च करून सिंहगड रस्त्यावर तीन टप्प्यात उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्त्या वरील वाहतूक कोंडी कमी होईल असा दावा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. राजाराम पूल ते जयदेव नगर आणि विठ्ठलवाडी ते फनटाईम थिएटर पर्यंतच्या पुलाचे उद्घाटन झाले आहे. आज तिसऱ्या टप्प्यातील माणिक बागेतील वीर शिवा काशीद चौक ते हिंगणे दरम्यानच्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून खुला करण्यात आला.
सकल मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मनोज जरांगे यांच्या सुरू असलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनानिमित्त पोलिसांचा मोठा फौजफाटा उद्घाटन परिसरात ठेवण्यात आला होता. उद्घाटनाच्या ठिकाणी पत्रकारांना मज्जाव करण्यात आला होता. उद्घाटन स्थळी पत्रकारांनी जाऊ नये यासाठी पोलिसांकडून त्यांना मिळालेल्या सूचनेनुसार सुमारे पाचशे फूट अंतरावर साखळी करून अडविण्यात आले होते.
उद्घाटनास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.