पिंपरी : भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर प्रवक्तेपदी कुणाल दशरथ लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. कुणाल लांडगे हे भाजपचे एक निष्ठावान कार्यकर्ते आहेत. २०१७ साली भाजपचे अधिकृत उमेदवार होते. २०१८ साली त्यांची प्रभाग स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. माजी शहराध्यक्ष आ. शंकर जगताप यांच्या कार्यकारिणीत २०२३ पासून ते शहर भाजपच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. संघटन कौशल्य, युवा आक्रमक चेहरा आणि पक्षाप्रती निष्ठा यामुळे त्यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असल्याचे भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी कुणाल लांडगे यांना नियुक्ती पत्र देताना सांगितले.
आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे आणि उमा खापरे यांच्या एकमुखी पाठिंब्याने भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
या निवडीवर मत व्यक्त करताना कुणाल लांडगे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे आणि उमाताई खापरे यांचा आभारी आहे. प्रवक्ता म्हणून माध्यमांसमोर आणि सोशल मीडियावर पक्षाची ध्येय धोरणे आणि विकासकामांची माहिती अधिक प्रभावीपणे मांडणार आहे. आगामी काळात होणाऱ्या मनपा निवडणुका मोठ्या फरकाने जिंकून पिंपरी चिंचवड मनपा वर पुन्हा भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे भाजपा शहर प्रवक्ते कुणाल लांडगे यांनी सांगितले.