बाणेर : शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच पुणे महानगरपालिका शासन नियुक्त सदस्य बाळासाहेब चांदेरे यांनी पुणे महानगरपालिकेत मंजूर केलेल्या कामाचे श्रेय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून आमदार शंकर मांडेकर यांना देण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या जाहिरातींच्या माध्यमातून केला जात आहे. यामुळे पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रेय वादाची लढाई सुस बाणेर बालेवाडी प्रभाग नऊ मध्ये सध्या रंगताना दिसत आहे.
एप्रिल महिन्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे शासन नियुक्त सदस्य शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदरे यांच्या माध्यमातून सुस नांदे रोडची दोन्ही बाजूने पाच मीटर रुंदी वाढवणे, सुस महाळुंगे पायगुडे यांच्या हद्दीलगत डीपी रस्ता विकसित करणे, सुसगाव गावठाण परिसरातील रस्ते विकसित करणे, सुसगाव परिसरातील रस्ते विकसित करणे, सुसगाव स्मशानभूमी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, तापकीर वस्ती, महादेव नगर बांदल वस्ती परिसरात प्रकाश व्यवस्था करणे, सुसगाव परिसरात मुख्य मलनिस्सारण वाहिनी विकसित करणे, महाळुंगे मुख्य रस्ता गावठाण परिसरातील रस्ते डांबरीकरण करणे, महाळुंगे शितळादेवी मंदिर रस्ता व स्मशानभूमी रस्ता प्रकाशयोजना करणे, महाळुंगे परिसरामध्ये ड्रेनेज लाईन विकसित करणे, स्मशानभूमी परिसरात सीसीटीव्ही बसवणे, सुस व महाळुंगे स्मशानभूमी कामांसाठी निधी आदी कामे बाळासाहेब चांदेरे यांच्या माध्यमातून बजेटमध्ये निधीसह सुचवण्यात आली होती.
यानुसार निधी उपलब्ध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांकडून आमदार शंकर मांडेकर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याची जाहिरात करत श्रेय राष्ट्रवादीकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यामुळे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील कामांचे श्रेय घेण्यासाठी नवीन स्पर्धा सध्या पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळत आहे.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये सध्या तरी महायुतीचे वर्चस्व आहे. यामुळे भाजपासोबत राज्यात सत्य असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये पालिका निवडणुकीत तिकिटांसाठी देखील स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
























