तीन तरुणांच्या सतर्कतेमुळे चार महिलांसह एक बालक आणि पुरुषाला जीवदान ;खडकवासला धरण नदीपात्रातील थरकाप उडवणारी घटना

खडकवासलाः धरणाच्या दरवाजातून नदीपात्रात पाटबंधारे विभागाने अचानक पाण्याचा विसर्ग वाढवल्याने पाण्यात अडकलेल्या चार महिला सह एक बालक आणि पुरुषाला वाचवण्यात तीन धाडसी तरुणांसह धरणावर धुणं धुण्यासाठी आलेल्या नागरिकांनी वाचवण्यात यश मिळवले. रविवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली.

मंगेश धावडे,(रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड) सुरज अंकुश कुडले ( रा. वारजे माळवाडी), ओंकार तीकोणे (रा.खानापूर, तालुका हवेली ) असे या धाडसी तरुणांची नाव आहे. मंगेश आणि सुरज कामानिमित्त धरण परिसरात आले होते. तर ओंकार त्याचवेळी तेथून प्रवास करत होता. घटनेचे गांभीर्य ओळखून तिघेही नदीपात्रात जाऊन तेथील धुणे धुण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या साड्या एकत्र बांधून त्याचा दोर करून ते अडकलेल्या महिलांपर्यंत पोहोचले. एका महिलेला तिच्या बाळासह पहिल्यांदा बाहेर काढले. त्यानंतर तीनही महिलांना टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्यात यश मिळवले.

नवरात्रीच्या निमित्ताने खडकवासला धरणाच्या मागे नदीपात्रात दरवर्षीप्रमाणे गोधड्या, सतरंज्या, चादरी आदी धुणं धुण्यासाठी वारजे, खडकवासला, उत्तम नगर कोंडवे, धावडे, रामनगर आदी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मागील दोन दिवसापासून रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत धरणाच्या दोन दरवाजांमधून नदीपात्रात 844 क्युसेक विसर्ग स्थिर करण्यात आला होता. हा प्रवाह गोधड्या ,आणि कपडे धुण्यासाठी लोकांना पर्वणी ठरली होती. अनेक ठिकाणी पाणथळ जागा आणि खडकाची बेटे निर्माण झाल्या होत्या. त्याचा फायदा घेत लोकांनी कपडे धुण्याचा मनोमन आनंद लुटला. उघड्या नदीपात्रातील जागेवर गोधड्या सतरंज्या चादरी वाळत घालून कोणी विश्रांती घेत होते तर कोणी आणलेली शिदोरी आपल्या कुटुंबासह जेवत होते.दुपारी तीन नंतर धरणाच्या भिंतीवरील सायरन वाजवून पाटबंधारे विभागाने पाण्याचा विसर्ग वाढवून 1712 क्यूसेक केल्याने पाण्यात अचानक वाढ झाली आणि नदीपात्रात खडकांची निर्माण झालेली बेटे पाण्याखाली गेली या बेटांवर बसलेले लोकांना अचानक पाणी वाढल्याने काहीच सूचेनासे झाले. नागरिकांना कपडे गोळा करता करता पळता होईल थोडी झाली.

See also  संदीप धारू बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन

अनेकांनी जीव वाचवण्यासाठी कपडे सोडून पाण्याच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न केला असेच एक रामनगर मधील कुटुंब आपल्या चार वर्षाच्या मुलांसह जेवण करून धुण्यास सुरुवात करणार असतानाच अचानक पाणी वाढले आणि त्यांना पाण्याबाहेर निघणे अवघड झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून मंगेश, सुरज आणि ओंकार यांनी तेथेच काठावर असलेल्या नागरिकांच्या धुण्यातील साड्या घेऊन साडीला साडी बांधून दोर तयार करून अडकलेल्या तीन महिलांसह दोन नागरिकांना वाचवण्यात यश मिळवले.

पोलीस बंदोबस्त फक्त कागदावरच
धरणावर विसर्ग वाढवून पाणी सोडले तेव्हा पोलीस प्रशासन घटनास्थळी नव्हते. सकाळी धुणे धुण्यासाठी परिसरातून आलेल्या नागरिकांची गर्दी झाल्याने उत्तम नगर पोलीस ठाण्याच्या दोन महिला अधिकाऱ्यांसह दोन पोलीस कर्मचारी होते. दुपारी साडेबारा नंतर पोलीस गायब झाले ते परत फिरकलेच नाहीत घटना घडल्यानंतर आपत्कालीन कामानिमित्त असलेले कर्मचारी घटनास्थळी आले होते.


घटनेचे गांभीर्य ओळखून पाटबंधारे विभागाने काही काळासाठी विसर्ग कमी केला परंतु घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी नागरिकांना त्यांच्या वस्तू घेऊन न देताच हाकलले त्यामुळे अनेकांच्या वस्तू नदीपात्रात राहिल्या तर अनेकांच्या वस्तू वाहून गेल्या. जीवदान मिळालेल्या महिला कुटुंबाच्या धुण्यासह इतर वस्तूही वाहून गेल्या.

घटनास्थळी आलेल्या पोलिसांशी बोलले असता पोलीस कर्मचाऱ्यांशी घटनेविषयी बोलले असता ते म्हणाले आम्ही सकाळपासून येथे बंदोबस्तासाठी आहे परंतु तिथे हजर असलेल्या नागरिकांनी सकाळी पोलीस येऊन गेल्यावर परत इकडे कोणी फिरकलेच नाही असे सांगितले. घटनास्थळी पोलीस असते तर नागरिकांना योग्य माहिती मिळाली असती आणि आलेल्या आपत्ती पासून सुटका झाली असती.