अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सहा पट मदत द्यावी – सुनील माने

पुणे : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे महायुती सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्यापेक्षा त्यांना एन.डी.आर.एफ च्या निकषापेक्षा सहापट किंबहुना त्याहून अधिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले, राज्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सामान्य माणसांसह शेतकरी संकटात आहे. मराठवाड्यात तर अत्यंत भीषण परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना मदत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एन.डी.आर. एफ च्या निकषानुसार मदत देण्याची घोषणा केली आहे. मात्र २०१९ साली कोल्हापूर, सांगली या ठिकाणी महापूर आला होता, त्यावेळी निवडणुकीचे वर्ष असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी एन.डी.आर.एफ च्या निकषांपेक्षा तीन पट अधिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. आता मराठवाड्यात सुद्धा तशीच परिस्थिती आहे. त्या शेतकऱ्यांना त्याच निकषानुसार मदत द्यावी. ही मदत सहा पटीपेक्षा अधिक असावी अशी मागणी माने यांनी केली आहे.

केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ निवारणासाठी एक नियमावली तयार केली आहे. त्यात दुष्काळ, ओला दुष्काळ हे शब्द गाळले गेले आहेत. केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे म्हणणे मोदीसाहेब ऐकतात. त्यामुळे फडणवीस यांनी पंतप्रधान आणि केंद्र सरकारला ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सांगितले पाहिजे त्याचप्रमाणे दुष्काळ निवारणासाठी असलेल्या नियमावलीत कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ हे शब्द समाविष्ठ करण्याची विनंती ही केली पाहिजे. राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या पिकविम्याची जाहिरात करण्यात राज्य सरकारने ५ हजार कोटी रुपये वाचवल्याचे मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांनी जाहीर केले होते. हे पैसे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी वापरावेत अशी मागणी ही सुनील माने यांनी केली आहे.

See also  पिंपरी चिंचवड शहरातील चिखली गावातील अरुंद रस्त्यांमुळे होणाऱ्या ट्रॅफिक च्या समस्येविरोधात  महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे आंदोलन