पुणे जिल्ह्यातील मंजूर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

पुणे : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, शहर बाह्य वळण रस्ते, इतर मंजूर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देऊन प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भूसंपादन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस सर्व भूसंपादन अधिकारी, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे यांच्याशी संबंधित खालील प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
१) रा.म. ६० – भिमाशंकर – तळेघरवाडा – राजगुरुनगर व रा.म. ६१ – बनकर फाटा – जुन्नर – घोडेगाव – तळेघर रोड.
२) रा.म. ७६१ बेल्हे – अळकुटी, निघोजे – राळेगाव – थेरपाळ रुंदीकरण व रा.म. ५४८ डी बेल्हे – अळकुटी, निघोजे – राळेगाव – थेरपाळ रुंदीकरण.
३) महाड – पंढरपूर रस्ता, भोर – वरंधा घाट (किमी ३३/५५० ते ९५/५५०).
४) नाशिक फाटा ते खेड एलीव्हेटेड कॉरिडॉर.
५) उंडवडी क.प. ते देशमुख चौक बारामती रस्ता.

या प्रकल्पांमधील प्रलंबित मोजणीप्रक्रिया तात्काळ करावी;  आवश्यक त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात मोजणी करावी, तसेच प्रकल्प पूर्ण करण्याच्या अनुषंगाने भूसंपादन प्रक्रिया अचूक व पारदर्शक पद्धतीने करून शेतकऱ्यांशी समन्वय साधून बहुतांश भूसंपादन संमतीने करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांच्याशी संबंधित पुढील प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला:-
१) पुणे इनर रिंगरोड.
२) चाकण शहरातील वाहतूक कोंडीसाठी बाह्यवळण रस्ता.
३) उसे येथील १५ मीटर रुंदीचा सेवा रस्ता.
४) नऱ्हे येथील नवले पुलाच्या दोन्ही बाजूने १२ मीटर सेवा रस्ता.

या प्रकल्पांसाठीही प्रलंबित मोजणी तात्काळ करून शेतकऱ्यांच्या संमतीने व पारदर्शक पद्धतीने भूसंपादन प्रक्रिया करावी तसेच ‘पीएमआरडीए’ विभागाने भूसंपादन हे टीडीआर द्वारे करण्यासाठी संबंधित खातेदारांसमवेत बैठक घेण्याची सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाशी संबंधित प्रकल्पांचा आढावा घेताना चाकण टप्पा क्र. ५, चाकण जोडरस्ता, तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. २, ४ व ५ तसेच जोडरस्ते, वाहनगाव औद्योगिक क्षेत्र, भोर – उत्रोली – वडगाव डाळ प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र आणि अतिरिक्त कुरकुंभ (पाटस) औद्योगिक क्षेत्र या प्रकल्पांसाठी बहुतांश भूसंपादन प्रक्रिया संमतीने करण्यावर भर द्यावा,यासाठी संपादन मंडळ म्हणून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ व संबंधित भूसंपादन अधिकारी यांनी खातेदारांसमवेत वेळोवेळी बैठकांचे आयोजन करावे, असे निर्देशही दिले. तसेच इतर प्रकल्पांमध्ये विद्युत विभागाचा ७६५ के.व्ही. शिक्रापुर – बाभळेश्वर – पुणे शहर – शिरूर, बाभळेश्वर – कडूस – जुन्नर – आंबेगाव हा वीजप्रकल्प तसेच राजमाता सईबाई स्मृतीस्थळ विकास आराखडा या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.सदर प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करून प्रक्रिया अचूक व पारदर्शकरितीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आल्या.

See also  प्रभाग 8 9 7 12 मधील प्रारूप मतदार यादीत चुका तातडीने दुरुस्त कराव्यात आणि त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे - राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने