सुस : सुसगाव येथील पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयासमोरील (ग्रामपंचायत) झाडे अनाधिकृत रित्या तोडून झाडांची लाकडे चोरण्यात आली आहेत. भर दिवसा नागरिकांच्या संवाद झाडे तोडली जात असताना देखील पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
सुसगाव परिसरातील मुख्य रस्त्या लगत असलेली मोठी झाडे पुणे महानगरपालिकेची उद्यान विभागाचे परवानगी न घेता तोडण्यात आले आहेत. झाडे तोडली जात असताना याबाबत नागरिकांनी विचारणा केली असता पुणे महानगरपालिका झाडे तोडत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर झाडाच्या फांद्या टेम्पोच्या साह्याने बाहेर काढण्यात आल्या. झाडे तोडल्यानंतर परस्पर फांद्यांची विक्री करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता झाडे तोडण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. ही झाडे परस्पर तोडण्यात आली असून याबाबत चौकशी करण्यात येईल तसेच दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. झाडे परस्पर तोडली जात असून पुणे महानगरपालिकेमध्ये कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवून खाजगी ठेकेदारांच्या मार्फत भ्रष्टाचार करत सध्या विकास सुरू आहे. यामध्ये पालिकेचे अधिकारी देखील समाविष्ट असून त्यावर कारवाई केली जात नाही या उलट पुणे महानगरपालिकेचे आयुक्त याकडे दुर्लक्ष करतात ही बाब गंभीर असल्याचे पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून सांगितले जात आहे.
पुणे मनपा शासन नियुक्त सदस्य तथा पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी वृक्षतोडीचा प्रकार गंभीर असून परवानगी न घेता दिवसा झाडे तोडली जात असेल तर यावर कडक कारवाई केली पाहिजे असे सांगितले.