HND हॉस्टेलच्या विक्रीविरुद्ध एका विश्वस्ताने भूमिका बदलली, पण पत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार

पुणे: शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट (एचएनडी), ही एक सार्वजनिक ट्रस्ट संस्था असून तिच्या ताब्यातील पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील तीन एकर जमीन विकण्याचा प्रयत्न ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाकडून केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुण्यातील गोखले लँडमार्क्स एलएलपी या बांधकाम कंपनीसोबत ₹२३० कोटींच्या व्यवहाराचे साठेखत करण्यात आले असून, हा परवाना मिळवताना धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल करण्यात आली असल्याचा आरोप समाजबांधवांनी केला आहे.

विशेष म्हणजे, या जमिनीबाबत विश्वस्तांनी समाजाला चुकीची माहिती दिली. सदर जागा खाजगी ट्रस्टची असल्याचे भासवून, इतरांनी हस्तक्षेप करू नये, अशी दिशाभूल करण्यात आली.

या विरोधात पुण्यातील संपूर्ण जैन समाज तसेच एचएनडी बोर्डिंगच्या सध्याच्या आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत, गेल्या गुरुवारी (२ ऑक्टोबर २०२५) जागतिक अहिंसा दिनानिमित्त, बोर्डिंगच्या प्रवेशद्वारासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन आयोजित केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने पुरुष आणि महिलांचा सहभाग होता. १५० पेक्षा अधिक जैन संघटना आणि विश्वस्त मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित राहून त्यांनी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शविला.

यावेळी सकल जैन संघ, पुणेचे अध्यक्ष श्री. विलास राठोड, अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय महामंत्री श्री. अशोक पगारिया, आणि पिंपरी-चिंचवड जैन महासंघाचे अध्यक्ष श्री. श्रेयस पगारिया यांनी या चळवळीला पाठिंबा देताना असे मत व्यक्त केले की, सार्वजनिक जैन ट्रस्टची जागा विकण्याचा हा प्रयत्न केवळ एचएनडी ट्रस्टपुरता मर्यादित नसून, संपूर्ण जैन संस्थांसाठी धोक्याचा इशारा आहे. या व्यवहाराविरोधात सर्व संप्रदाय एकत्र येऊन रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला.

जिटो पुणे चॅप्टरचे अतिरिक्त संचालक श्री. लक्ष्मीकांत खाबिया यांनी देखील या आंदोलनास पाठिंबा दर्शवित कायदेशीर लढाई अधिक बळकट करण्याचा सल्ला आंदोलकांना दिला.या निषेध सभेत विश्वस्तांपैकी एक, श्री. चकोर गांधी हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी घोषित केले की त्यांनी एचएनडी हॉस्टेल प्रॉपर्टीच्या या प्रस्तावित विक्रीविरुद्ध आधीच भूमिका घेतली आहे परंतु त्यांनी धर्मादाय आयुक्तांना उद्देशून लिहिलेल्या असहमती पत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला.

मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा मंडळाचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमींनी देखील या व्यवहाराचा तीव्र निषेध नोंदवत, सदर जागेवरील २५० हून अधिक वृक्ष तोडले जाण्याची शक्यता व्यक्त केली.

saveHND आणि SHND Alumni Association (ASHA) च्या वतीने शेकडो माजी विद्यार्थ्यांनी ठाम भूमिका घेत, सदर व्यवहार तात्काळ रद्द करावा, अशी मागणी केली. “बोर्डिंगची एक इंच जागा देखील बिल्डरला देऊ नये,” असा निश्चय त्यांनी व्यक्त केला.

ही तीन एकर जागा १९६० मध्ये स्थापन झालेल्या ‘श्री १००८ महावीर भगवान दिगंबर जैन मंदिरा’चेही वास्तव्य असलेली असून, विश्वस्त मंडळ आणि बिल्डरच्या सादर केलेल्या कोणत्याही कागदपत्रांमध्ये या मंदिराचा उल्लेख नाही, ही बाब महिलांनी विशेषतः अधोरेखित केली. त्यांनी हा जैन मंदिर हटविण्याचा हेतुपुरस्सर कट असल्याचा आरोप करत, हा फसव्या आणि लबाडीच्या पद्धतीने करण्यात आलेला व्यवहार तात्काळ रद्द करावा, अशी जोरदार मागणी केली.

या आंदोलनाचे नेतृत्व ॲड. योगेश पांडे, श्री. अण्णासाहेब पाटील, श्री. चंद्रकांत पाटील, ॲड. कौशल जिंतूरकर, श्री. अक्षय जैन, श्री. आनंद कांकरिया, आणि श्री. स्वप्नील गंगवाल यांनी केले. त्यांनी संपूर्ण व्यवहारामागील तथ्ये व कायदेशीर बाबी स्पष्टपणे मांडल्या.
या आंदोलनाला श्री. सुभाष खोत, डॉ. कल्याण गंगवाल यांच्यासह पुण्यातील विविध जैन संप्रदायांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  ‘जिल्हा न्यायालय-स्वारगेट भुयारी मेट्रोमार्ग काही दिवसांतच पुणेकरांच्या सेवेत’ स्वारगेट-कात्रज मेट्रोमार्गाचेही त्याचवेळी भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती