पुणे : नागरिकांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळवण्याबरोबरच सार्वजनिक रित्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार उघडकीस आणावेत असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. माहितीचा अधिकार कायद्याच्या (RTI Act) २० व्या वर्धापन दिनानिमित्त माहिती अधिकार कट्ट्यातर्फे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनीया, माजी IAS अधिकारी महेश झगडे, आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.
सार्वजनिक रित्या उपलब्ध असलेली माहिती कशी मिळवावी आणि त्याचं विश्लेषण कसं करावं याची माहिती अंजली दमानिया यांनी प्रात्यक्षिकांसह उपस्थितांना दिली. आपण बहुतेक वेळा सार्वजनिक रित्या उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करतो. त्यामुळे कोणीतरी आपल्याला माहिती देत असतं हा आरोप खोटा असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच RTI कायद्याचा उपयोग करून सार्वजनिक माहितीच्या माध्यमातून भ्रष्टाचार उघड करण्याची संधी सर्व नागरिकांकडे आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की सर्वांनी पुढे येऊन RTI कायद्याचा सक्रियपणे उपयोग करावा आणि आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा.
देशात आणि राज्यातही माहिती अधिकार कायद्याची हेळसांड होत असून माहिती अधिकार मागितलेली माहिती मिळत नाही नागरिकांना थातूरमातूर उत्तर मिळतात त्यामुळे हा कायदा संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरीही काही लोक निर्धारपूर्वक माहिती मागत आहेत नी त्याचा पाठपुरावा करत आहेत त्यामुळे थोडीशी आशा जिवंत आहे, याच आशेला आणखी बळकट केले पाहिजे आणि जो अधिकार लयाला गेलेला आहे तो पुन्हा एकदा मिळवण्यासाठी या कायद्याला बळ दिले पाहिजे. हा कायदा पुन्हा आपल्या मूळ पदावर कसा येईल किंवा शक्तिमान कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणूनच माहिती अधिकार कायद्याच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त पारदर्शकतेल बळ देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे माहिती अधिकार कट्ट्याचे संस्थापक विजय कुंभार यांनी सांगितले.
दत्तात्रय वारे गुरुजींनी जिल्हा परिषदेच्या शाळेत बदल घडवून आणून, अडथळ्यांना तोंड देत, शिक्षण प्रणाली सुधारण्याच्या आपल्या निर्धाराने आंतरराष्ट्रीय ओळख मिळवली. तसेच कितीही अडथळे आले तरी आपले काम थांबवणार नाही असा निर्धारही व्यक्त केला. त्यांच्या प्रेरक कार्यामुळे सभागृहात उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा वर्षाव करून त्यांचे अभिनंदन केले. .
माजी IAS अधिकारी महेश झगडे म्हणाले की जागतिक पातळीवर लोकशाहीचा निर्देशांक (index of democracy) कमी होत आहे. जर आपण खरोखर बदल पाहू इच्छितो, तर प्रशासनिक प्रणालीमध्ये खोलवर सुधारणा करणे अत्यावश्यक आहे.
या कार्यक्रमाने स्पष्ट केले की माहितीचा अधिकार हा केवळ कायदा नाही, तर समाज सुधारण्यासाठीची ताकद आहे.या कार्यक्रमांमध्ये काही लोकांनी आपल्या भूमिका मांडल्या. त्यामध्ये रजनीश पोटे यांनी माहिती अधिकारातून आपल्या भागातील रस्ता कसा करून घेतला याची माहिती दिली.पोटे एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करतात. अकोले जिल्ह्यामध्ये अडीचशे कोटी रुपये किमतीचा रस्ता पैसे मान्य झाले असूनही त्यातील काही पैसे घेऊन थातूरमातूर काम करून सोडून दिला होता. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. पोटे यांनी माहिती अधिकारातून माहिती मागून त्याचा पाठपुरावा केला आणि अखेर अगदी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.त्यानंतर बऱ्याच प्रयत्नाने तो रस्ता अखेर पूर्णत्वास गेला आहे.
पुण्यातील शेखर लांडगे या शेतकऱ्याने आपली जमीन कोणतेही कारण नसताना अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मिलिटरीच्या ताब्यात गेली होती. अधिकाऱ्यांनी अनेकदा चुकीचे नकाशे केले. त्याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर. आता त्याच्यातील चूक मान्य करण्यात आली आहे, मात्र अद्यापही जागा ताब्यात मिळाली नसल्यामुळे आणि दोषी अधिकाऱ्यांमार कारवाई करण्यात आली नसल्याने अगदी मुख्य सचिवापर्यंत त्याचा पाठपुरावा कसा केला याची माहिती दिली.
तर आणखी एक शेतकरी गोरख तळेकर यांनी भूमी अभिलेख विभागातील जवळपास ३५ प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांनी कशा चुका केल्या याची माहिती माहिती अधिकाराच्या माध्यमातून काढली आणी अखेर काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले .परंतु ज्यांच्या जागांचे चुकीच्या पद्धतीने नकाशे करण्यात आले त्यांना मात्र अद्यापही न्याय मिळाला नसल्याने खंत व्यक्त केली. तर उद्योजक राहुल भास्कर यांनी आपल्या वॅट प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून ही कशी हेळसांड झाली आणि दोषी न्यायाधीशांना काढून टाकण्यात आल्याची किंवा त्यांना राजीनामा देण्यास लावल्याची माहिती न्यायालयांकडून कशी लपवली जात आहे याची माहिती दिली.
एका औषध कंपनीतील निवृत्त कर्मचारी रमेश बोराडे यांनी शासकीय कार्यालयामध्ये पाठपुरावा केल्यास कशा पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेता येते याबाबत माहिती दिली. एक रिक्षाचालक तुषार पवार यांनी आपल्या भागातील सार्वजनिक कामांची माहिती घेण्यासाठी आपण माहिती अधिकार कायद्याचा कसा वापर केला आणि त्यावेळेला राजकीय पक्षांकडून कसा कसा विरोध झाला आणि आपण त्याच्यावर कशी मात केली याचे उदाहरण दिले. तर दुसरे एक दिव्यांग बांधव मंगेश गुजर यांनी आपण २०१४ पासून माहिती अधिकार कायद्याचा वापर करत असून त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले आणि जर तुमचं उद्देश चांगला असेल तर माहिती अधिकाराचा वापर कसा कार्यक्षम पद्धतीने करता येतो याबाबत माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनीता देशमुख आणि जयसिंह जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कद्रे यांनी केले तर आभार मृणाल ढोले यांनी मानले .
घर ताज्या बातम्या नागरिकांनी माहिती अधिकाराचा वापर करून आपल्या हक्कांसाठी आवाज उठवावा – अंजली दमानीया