पुणे : पुणे विद्यापीठ चौक (आनंदऋषीजी चौक) येथील दुमजली उड्डाणपुलास प्रस्तावित असलेले “स्व. नामदार श्री. अजितदादा अनंतराव पवार उड्डाणपूल” या नावाच्या प्रकल्पातील बाणेर व पाषाण बाजूच्या रॅम्पसह रखडलेल्या कामांची संयुक्त पाहणी नगरसेवक दत्ता बहिरट व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
नगरसेवक दत्ता बहिरट यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA), आकुर्डी तसेच Pune Municipal Corporation (पुणे मनपा) यांना पत्र देऊन रॅम्प व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली होती. त्यानुसार दोन्ही संस्थांतील संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान PMRDA चे प्रतिनिधी सुजित यादव यांनी पाषाण रस्ता रॅम्पचे काम पाणीपुरवठा विभागाच्या पाईपलाईनमधील गळतीमुळे रखडल्याचे सांगितले. याबाबत पुणे मनपा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी विद्या वाबळे यांनी माहिती देताना गळती शोधण्यासाठी रस्ता खोदाई आवश्यक असून त्यासाठी पथ विभागाची परवानगी अद्याप मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच विद्यापीठ चौकातील मेट्रो स्टेशनसाठी पाणी कनेक्शन देण्यासाठीही रस्ता खोदाईची परवानगी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मनपा पथ विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. वाघमारे व श्री. खोत उपस्थित होते. नुकत्याच पार पडलेल्या सायकल स्पर्धेमुळे संबंधित रस्त्यावर खोदाई करता आली नाही, तसेच रस्ता नव्याने तयार झाल्याने विशेष परवानगीची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र याबाबत तातडीने कार्यवाही करून पाणीपुरवठा विभागास खोदाई परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
नगरसेवक दत्ता बहिरट यांनी यावेळी “स्व. नामदार श्री. अजितदादा अनंतराव पवार उड्डाणपूल” या प्रकल्पातील बाणेर व पाषाण बाजूचे रॅम्प आणि उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून पूल नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करावा, अशी ठाम मागणी केली.
दरम्यान, या उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळाल्यास बाणेर, पाषाण व विद्यापीठ चौक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.























