पुणे : कधीकाळी सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये सातत्याने मारामारी, गँगवार, खंडणी छेडछाड अशा पद्धतीचे गुन्हे घडत आहेत आणि अनेक कुविख्यात गुंडांना राजकीय आश्रय असल्याचे समोर येते आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी तर्फे आज शिवाजीनगर मेट्रो स्टेशन जवळ तीव्र निदर्शने करण्यात आली व सरकारला प्रश्न विचारण्यात आले. मारणे, घायवळ, आंदेकर, मोहोळ आदी टोळ्यांची नावे पुढे येत असून यांना सहाय्य केल्याच्या आरोप, प्रत्यारोप काही आजी माजी आमदार करीत आहेत.
पुण्यामध्ये कोयता गॅंगवॉर जोरात असून पोलिसांचा आणि काही राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचे समोर येते आहे. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकर मात्र भयभीत झालेला आहे. या अस्वस्थ, हतबल पुणेकराचा आवाज उठवण्यासाठी आम आदमी पार्टी तर्फे हे आंदोलन करण्यात आले असे आप चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांमध्ये सत्ताधारी भाजपचे आणि महायुतीतील काही नेते गुंडांच्या घरी भेट दिल्याच्या बातम्या येतात तर कधी कुणाला बाहेर देशात पळून जाण्यासाठी मदत केल्याचे आरोप होत आहेत. त्यातच रस्त्यावरून चालणाऱ्या सामान्य माणसावरही किरकोळ गोष्टीवरून चाकूने वार होण्याच्या घटना घडत आहेत. पोलिसांवरही हल्ल्याच्या बाबी आता समोर आले आहेत. दिवसा उजेडी दुकानातून दागिने हिसकावून घेतल्याची घटना,या अशा अनेक घटनांमुळे सर्वसामान्य माणसाला आपल्या कुटुंबीयांची चिंता वाटत राहते आणि हा हल्ला कुणाही निरपराध व्यक्तीवर होऊ शकतो ही भीती सामान्य माणसाच्या मनामध्ये तयार झाली आहे. पोलीस आणि प्रशासनाने याविरुद्ध मोठी मोहीम राबवण्याची गरज असून राजकीय नेत्यांचा आशीर्वाद, कृपादृष्टी असणाऱ्यांचीही हयगय करू नये आणि ही गुंडगिरी नेस्तनाबुत करावी अशी अपेक्षा आम आदमी पार्टीने व्यक्त केली आहे.
या आंदोलना मध्ये आपचे मुकुंद किर्दत, धनंजय बेनकर ,अक्षय शिंदे, सुभाष करांडे, सुरेखा भोसले,शंकर थोरात,किरण कद्रे,निलेश वांजळे,मनोज शेट्टी,श्रद्धा शेट्टी,फेबियन सॅमसन,कुमार धोंगडे, संजय कटारनवरे,शितल कांडेलकर,प्रमोद नाडे,सतीश यादव ,अनिकेत शिंदे,स्वप्निल चौधरी,अंजना वांजळे, दिगंबर लालसरे आदी उपस्थित होते.