महासंस्कृती महोत्सवात राहुल देशपांडे यांनी गायलेल्या अभंगांनी श्रोते भक्तीरसात दंग

पुणे : सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी गायलेल्या ‘कानडा राजा पंढरीचा’, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, अशा एकापेक्षा भावपूर्ण अभंगांनी गुरुवारी (ता.१) येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात उपस्थित रसिक भक्तीरसात न्हावून निघाले.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत पुणे येथील अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे गदिमा सभागृह आणि सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृह येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. 

या महोत्सवांतर्गत गुरुवारी रात्री  ‘अभंग रंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा आनंद घेतांना रसिक तल्लीन झाले. ‘मोगरा फुलला’ या भावगीताला अमर ओक यांनी बासरीची तेवढीच सुमधूर साथ दिल्याने सूर आणि भक्तीरसात रसिक चिंब झाले. विठू नामाच्या गजरात एका उंचीवर जावून कार्यक्रमाची सांगता झाली.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात आयोजित ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाट्याच्या खेळाने प्रेक्षकांना तुफान हसवत आणि शेवटी शेतकरी आत्महत्या याविषयी गंभीर करणाऱ्या संहितेने खिळवून ठेवले. संतोष पवार यांची कलाकृती आणि प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाने रसिकांची दाद मिळवली.

शनिवारीही एकापेक्षा एक कार्यक्रम
अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात २ मार्च रोजी दुपारी २ ते सायं. ५ वाजेपर्यंत विनाशलिला, ना ना नाना, चाहुल या एकांकिका, सांय. ६ ते ९ यावेळेत ‘बोक्या सातबंडे’ बालनाट्य, रात्री ९ ते १२ या वेळेत देशभक्तीपर गीते तर गदिमा सभागृह बारामती येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ‘बोक्या सातबंडे’ बालनाट्य, दुपारी २ ते सांय. ५ या वेळेत लाली, भुताचे भविष्य, लेबल या एकांकिका, सायं. ५ ते ९ यावेळेत ‘गीत रामायण’ हे कार्यक्रम होणार आहेत.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येरवडा येथे आयोजित महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. तसेच पुरातत्व विभागाकडून जतनकार्य असलेल्या गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, महिला स्वयंसहायता बचत गटांचे विविध हस्तकला, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले असून अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची चवही महोत्सवात चाखता येत आहे.

See also  रात्रीच्यावेळी होणाऱ्या बांधकामा विरोधात कडक भूमिका घ्या -आमदार सिद्धार्थ शिरोळे