मुंबई
: राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. या कालावधीत एकूण १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे. ४ ते २० मार्च २०२३ या कालावधीत राज्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने कडधान्य, फळ पीके, भाजीपाला, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्रा, मका इत्यादी पिकांचे नुकसान झाले. दि. ४ ते ९ मार्च २०२३ या कालावधीत राज्यातील ३८ हजार ६०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १५ ते २० मार्च या कालावधीत १ लाख ६० हजार ८८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मार्चअखेर एकूण १ लाख ९९ हजार ४८६ क्षेत्र बाधित असून हे सर्व पंचनामे करण्यात आलेले आहेत. निधी मागणीसाठी जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून तत्काळ निधी वितरणाला मंजुरी दिली जाईल, असे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे
.