मतदान जनजागृतीसाठी भित्तीपत्रकाचे प्रदर्शन

पुणे, दि. ३१: शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्यावतीने राजा रविवर्मा कलादालनात निवडणूक साक्षरता क्लबमधील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या मतदार जनजागृतीपर भित्तीपत्रक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.  

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  दादासाहेब गीते, अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी  रवी खंदारे, नायब तहसीलदार सायली धस, स्वीप प्रमुख प्रज्योती बिचुकले, स्वीप समितीचे दीपक कदम, सागर काशीद,राजेंद्र मोरे, पांडुरंग महाडिक उपस्थित होते.

भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार  तरुणांचा आणि भावी मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याच्या आणि जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने निवडणूक साक्षरता क्लब  शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापन करण्यात आले आहेत. प्रदर्शनात
२० शालेय व ६ महाविद्यालयीन  क्लबमधील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती या विषयावर रंगविलेले २५० भित्तीपत्रक लावण्यात आले होते.

प्रदर्शनाला  विद्यार्थी पालक व मतदारांनी भेट दिली.

ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे आवाहन

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात मागील लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप पथकामार्फत ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, अंगणवाडी पालक सभेत मतदान जागृती करण्यात येत असून त्याअंतर्गत औंधगाव येथील विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्यात आले.

या मतदार संघातील जनवाडी येथील अंगणवाडी क्रमांक ५१ मधील पालक सभेत मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करुन मतदानाची शपथ देण्यात आली.

See also  विंझर येथे न्यू इंग्लिश स्कूल मधील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व वह्या वाटप