पुणे | प्रतिनिधी : पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ (औंध–बोपोडी) मध्ये राजकीय वातावरण तापले असून, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार निवडीमुळे परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपकडून उमेदवारी मिळालेले बहुतांश उमेदवार हे पूर्वी काँग्रेस पक्षाशी संबंधित किंवा काँग्रेसमधून पक्षांतर करून आलेले असल्यामुळे, “टीम काँग्रेसलाच भाजपचे तिकीट दिले आहे का?” असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
सनी निम्हण आणि आनंद छाजेड हे दोघेही पूर्वी काँग्रेस पक्षातून नगरसेवक राहिलेले असून, आता त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय औंध येथील गायकवाड घराणेही पूर्वापार काँग्रेस पक्षाशी जवळीक असलेले मानले जाते. त्यामुळे भाजपच्या उमेदवार यादीत काँग्रेस पार्श्वभूमीच्या नेत्यांचे प्राबल्य स्पष्टपणे दिसून येत आहे.
औंध–बोपोडी परिसरामध्ये पूर्वी अनेक वर्षे काँग्रेस पक्षाचेच नगरसेवक निवडून येत होते. मात्र २०१७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मोठी झेप घेत प्रभागातील चारही जागा जिंकल्या होत्या. त्या वेळी भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी स्थानिक कामांच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली होती. असे असतानाही यंदाच्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून काँग्रेसमधून आलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याने भाजपच्या अंतर्गत रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार या उमेदवारांना मनापासून स्वीकारणार का? की काँग्रेस पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांबद्दल नाराजी व्यक्त करत मतदार वेगळा निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये याबाबत संभ्रम आणि अस्वस्थता असल्याचीही चर्चा आहे.
एकूणच, यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मध्ये थेट भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत न होता, “काँग्रेस पार्श्वभूमी असलेले उमेदवार विरुद्ध भाजपचा पारंपरिक मतदार” असा वेगळाच राजकीय संघर्ष पाहायला मिळणार का, हे येणारा काळच ठरवणार आहे. त्यामुळे या उमेदवारांना भाजपचा मतदार कितपत स्वीकारतो, हेच प्रभाग ८ च्या निवडणूक निकालाचे प्रमुख सूत्र ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.























