बाणेर : योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विवाहासाठी दोन गरजू मुलींना संसारोपयोगी भांडी भेट देण्यात आली. कु. पलक काते व कु. स्विटी कुमारी या मुलींना विवाहप्रसंगी संस्थेच्या वतीने भांड्यांचा संसार प्रदान करण्यात आला.
हा उपक्रम संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, शंकरराव सायकर, संचालिका रंजना कोलते, ह.भ.प. संजय बालवडकर तसेच अंजली बालवडकर उपस्थित होते.
याचवेळी योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची ९ वी मासिक सभा पार पडली. सभेमध्ये संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सध्या संस्थेचे एकूण १३,००० सभासद असून,संस्थेच्या एकूण ठेवी १५८ कोटी रुपये,
सभासदांना दिलेले कर्ज १४० कोटी रुपये, तर इतर बँकांतील गुंतवणूक ५७ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती देण्यात आली.
संस्था केवळ आर्थिक व्यवहारांपुरती मर्यादित न राहता सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्याचा निर्धार संचालक मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.























