पाषाण तलावातील प्रदूषणामुळे हजारो मासे मृत; मनपा प्रशासन खडबडून जागे आयुक्त नवल किशोर राम यांची पाषाण तलाव परिसरात पाहणी

पुणे : पाषाण तलावामध्ये जलपर्णीचे प्रचंड वाढलेले प्रमाण आणि सांडपाणी सोडण्यात आल्यामुळे हजारो मासे मृत पडल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पुणे महानगरपालिका प्रशासन अखेर खडबडून जागे झाले आहे.

या घटनेनंतर मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी तातडीने पाषाण तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तलावातील जलशुद्धीकरण प्रकल्पालाही भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

या पाहणीदरम्यान नगरसेविका मयुरी कोकाटे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, राहुल कोकाटे, उपायुक्त किशोरी शिंदे, सहाय्यक आयुक्त विजय नायकल, म्हस्के, समीर उत्तरकर, संतोष गायकवाड, मयूर सुतार आदी उपस्थित होते.

तलाव परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली असून, ती काढण्यासाठी सातत्याने मागणी करण्यात येत होती. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने परिस्थिती गंभीर बनली. दरम्यान, तलावात विषारी सांडपाणी मिसळल्याने हजारो मासे मृत पावल्याचे समोर आले आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत आयुक्तांनी तातडीने योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच तलावाशी संबंधित एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) योग्य प्रकारे कार्यरत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

तसेच महामार्गालगतून मोठ्या प्रमाणात राडारोडा तलावात टाकला जात असल्याचे निदर्शनास आले असून, अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. पाषाण तलावातील वाढते प्रदूषण आणि प्रशासनाची ढिलाई यामुळे पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

See also  छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी बारामती सज्ज