पुणे : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ अंतर्गत My City My Promise या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातून शहरात नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने बालाजी माध्यमिक विद्यालय येथे हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमाच्या वेळी शाळेचे मार्गदर्शक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी “My City My Promise” हे प्रेरणादायी गीत सादर करून स्वच्छता, वाहतूक नियम, पर्यावरण संरक्षण, पाणी बचत व जबाबदार नागरिकत्वाचा संदेश प्रभावीपणे दिला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमात शिक्षक सारस्वती गुजले, संतोष पुरंदरे आणि अर्चना कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव रुजवणे व पालकांपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. संजय नायडू यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.
बालाजी माध्यमिक विद्यालयाने रोटरीच्या My City My Promise प्रकल्पात सक्रिय सहभाग नोंदवत समाजहितासाठी शाळा केवळ शिक्षणापुरती मर्यादित नसून संस्कार आणि जबाबदारी घडविण्याचे कार्य करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.
























