पुणे | प्रतिनिधी : सूस परिसरातील साईरंग गार्डन सोसायटी (जोशी वडेवाले पाठीमागे) येथील सुमारे ६०० ते ७०० नागरिकांच्या सोसायटीकडे मागील काही वर्षांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिक राजकारणी व त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते सोसायटीतील नागरिकांना दहशतीखाली ठेवत असून, त्यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित राहिले असल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे, NA कलेक्टर अमेनिटी व ओपन स्पेस मंजूर असतानाही, काही राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादाने बाहेरून २ JCB आणि १२ डंपर साईरंग गार्डन सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्क करण्यात आले आहेत. यामुळे सोसायटीतील सुमारे १५० कुटुंबांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या वाहनांच्या सततच्या ये-जा आणि पार्किंगमुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणासंदर्भात साईरंग गार्डन सोसायटीच्या नागरिकांनी आज दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी बावधन पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत बेकायदेशीर पार्किंग तात्काळ हटवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास साईरंग गार्डन सोसायटीतील सर्व नागरिक लवकरच उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. या घटनेमुळे सूस परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


























