पिंपरी/पुणे: “आयुर्वेद हे शाश्वत व प्राचीन शास्त्र आहे. वेदिक संस्कृती, भारतीय परंपरा, आयुर्वेदासारखे प्राचीन शास्त्र आणि त्याला तंत्रज्ञानाची मिळालेली जोड मानवी आरोग्यासाठी प्रभावी उपचार पद्धती विकसित करण्यात उपयुक्त ठरेल. आयुर्वेदामध्ये सखोल तंत्रज्ञान व्हावे आणि त्यातून जगाला चांगल्या आरोग्याची संजीवनी द्यावी,” असे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी केले.
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठातर्फे वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल अमेरिकास्थित न्यूरोसायंटिस्ट डॉ. टोनी नेडर व वाघोली येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे अध्यक्ष, आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सदानंद सरदेशमुख यांना मानद डॉक्टरेट (डॉक्टर ऑफ सायन्स) देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव डॉ. स्मिता जाधव, खजिनदार डॉ. यशराज पाटील, कुलसचिव डॉ. जे. एस. भवाळकर, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटरचे प्राचार्य डॉ. गुणवंत येवला आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटरच्या पुढाकाराने विद्यापीठाच्या आवारात आठव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे आयोजन केले आहे. यामध्ये देश-विदेशातील सुमारे १२०० पेक्षा अधिक डॉक्टर्स, आयुर्वेदाचार्य व विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आयुर्वेदिक औषधी व साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. आयुर्वेदातील विविध विषयावर व्याख्याने, शोधनिबंध सादरीकरण व विचार मंथन या परिषदेमध्ये होत आहे.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, “डॉ. टोनी नेडर वेदिक संस्कृती, आयुर्वेद, मन व शरीर स्वास्थ्य यासंबंधित केलेले कार्य आणि डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी आयुर्वेद व आधुनिक शास्त्राची सांगड घालीत कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर केलेले कार्य आपल्या सर्वांसाठी आदर्शवत आहे. अशा या दोन असामींचा सन्मान विद्यापीठाच्या वतीने करण्याचे आम्हाला भाग्य लाभले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने कायमच संशोधनाला प्रोत्साहन दिले आहे.”
डॉ. टोनी नेडर म्हणाले, “जागतिक स्तरावर कीर्ती असलेल्या या संस्थेच्या वतीने मानद डॉक्टरेट स्वीकारताना मला आनंद होतो आहे. आपण दिलेल्या मानसन्मान, आदराने भारावून गेलो आहे. वैदिक साहित्य जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी वैज्ञानिक मार्ग दाखवते. अस्तित्वाचा मूलभूत सार असलेली ‘जाणीव’ सर्वप्रथम आहे. या जाणीवेचा विस्तार हाच मानवी प्रवासाचा मूलभूत हेतू आहे. या गूढ सत्यांना प्राचीन वैदिक ग्रंथांमध्ये स्थान असून, आनंदाच्या शोधाला जाणीवेच्या विस्ताराशी जोडण्याचे काम होते. वेद मानवी शरीरक्रिया, शरीरशास्त्र, पेशी जीवशास्त्र आणि डीएनए यांच्याशी निगडित आहेत. ज्ञान केवळ तत्वज्ञान नव्हे, तर वैज्ञानिक वास्तवही आहे.”
डॉ. सदानंद सरदेशमुख म्हणाले, “आयुर्वेदात कर्करोग पूर्णतः बरा होणार नसला, तरी रुग्णाला दिलासा मिळण्याचा मार्ग आहे. गेल्या तीस वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे संशोधन करत आहोत. पारंपरिक आयुर्वेदाला आधुनिक संशोधन व तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रगत उपचार पद्धती विकसित केल्या जात आहेत. आज देश परदेशातून आयुर्वेद शिकायला लोक पुण्यात येताहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. रशिया, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, ब्राझिल यासह इतर अनेक देशात आयुर्वेद जनजागृती व प्रसार केला जातो. असाध्य व्याधींवर आयुर्वेद प्रभावीपणे काम करत आहे, याचे समाधान वाटते.”
प्रा. डॉ. जे. एन. पवार यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. डॉ. जे. एस. भवाळकर यांनी आभार मानले.